सोलापुरातील वास्तव ! "महात्मा फुले जन आरोग्य'चा अवघा 514 रुग्णांनाच लाभ 

Mahatma Phule Jan Arogya Yojana
Mahatma Phule Jan Arogya Yojana

सोलापूर : कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्‍यता व्यक्‍त करीत सरकारने सर्वच कोरोनाबाधितांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचाराची सोय करून दिली. मात्र, सोलापूर शहर-जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 41 रुग्णालये असतानाही सद्य:स्थितीत शहरातील सात आणि ग्रामीणमधील दोन हॉस्पिटलमध्येच ही योजना सुरू आहे. आतापर्यंत शहरात तीन हजार 800 हून अधिक रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तरीही शहरातील सात रुग्णालयांतून फक्त 514 रुग्णांनाच जनआरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. 

सोलापूर शहरातील अश्‍विनी ग्रामीण कुंभारी हॉस्पिटल, अश्‍विनी सहकारी रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, गंगामाई, नवजीवन, मार्कंडेय आणि यशोधरा रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात आहे. या रुग्णालयांपैकी अश्‍विनी ग्रामीण रुग्णालयाने 139 रुग्णांना या योजनेतून मोफत उपचार केले आहेत तर अश्‍विनी सहकारी रुग्णालयातून आठ, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातून 262, गंगामाई हॉस्पिटलमधून 13, मार्कंडेय रुग्णालयातून 73, यशोधरा हॉस्पिटलमधून 18 तर नवजीवन रुग्णालयाकडून एका कोरोनाबाधित रुग्णाला या योजनेतून मोफत उपचार मिळाले आहेत. या सात रुग्णालयांमध्ये एकूण 13 हजार 285 बेड उपलब्ध असून त्यामध्ये 724 आयसीयू बेड असल्याची माहिती जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. दीपक वाघमारे यांनी "सकाळ'ला दिली. मात्र, शहरात आतापर्यंत 327 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या तीन हजार 835 हून अधिक झाली आहे. तरीही या योजनेतून 514 रुग्णांनाच लाभ मिळाला, याचे कोडे सुटलेले नाही. 

जन आरोग्य योजनेची शहरातील स्थिती 

  • सरकारी रुग्णालये : सहा 
  • खासगी रुग्णालये : 35 
  • सध्या सुरू असलेली रुग्णालये : 7 
  • योजनेचा लाभ मिळालेले रुग्ण : 514 
  • एकूण रुग्णसंख्या : 3,835 

शहरातील 514 रुग्णांना योजनेचा लाभ 
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. दीपक वाघमारे म्हणाले, व्हेंटिलेटर लावून दहा दिवस उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी जनआरोग्य योजनेतून 50 हजार रुपये तर विनाव्हेंटिलेटर सात दिवस उपचार घेतलेल्या रुग्णांना 25 हजार रुपयांचा लाभ दिला जातो. परंतु, लक्षणे नसलेल्या रुग्णांना योजनेचा लाभ मिळत नाही. आतापर्यंत शहरातील 514 रुग्णांना एक कोटी 31 लाख 75 हजार रुपयांचा लाभ या योजनेतून देण्यात आला आहे. राज्यातील अन्य काही शहरांच्या तुलनेत सोलापूर शहरातील अधिक रुग्णांना योजनेचा लाभ झाला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com