महाराष्ट्र बंद ; सोलापुरात महापालिका परिवहन व्यवस्था कोलमडली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

  • भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याला सोलापुरातून विविध संघटनांकडून विरोध 
  • महाराष्ट्र बंदला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद : महापालिका परिवहन व्यवस्था कोलमडली 
  • मुख्य बाजारपेठांमध्ये शुकशुकाट : 'राज्य परिवहन'चा सावध पवित्रा 
  • बाजारपेठ बंद अन्‌ सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिकांची पायपीट 

सोलापूर : भारतीय नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून वंचित बहूजन आघाडीसह विविध संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. सोलापुरातील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत दुकाने बंद ठेवली आहेत. शहरातील नवी पेठ, आसरा चौक, मंगळवार पेठ यासह अन्य भागातील दुकाने बंद ठेवण्यात आल्याने त्या परिसरात शुकशुकाट दिसत आहे. बंदच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली असून नागरिकांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. 

हेही आवश्‍य वाचाच : पुतण्याकडे 'ओबीसी' तर खासदारांकडे 'एससी'चे प्रमाणपत्र 

राज्यातील कोणत्याही विषयांवरील आंदोलनात बहूतेकवेळा राज्य परिवहन महामंडळाच्या बसलाच टार्गेट केले जाते. हा अनुभव लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक राहूल तोरो यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून वाहतूक बंद ठेवावी अथवा वाहतूक अन्य मार्गाने वळवावी असे पत्र पाठविले आहे. आतापर्यंत कोणत्याही जिल्ह्यातील वाहतूक बंद ठेवण्यात आली नसल्याचे श्री. तोरो यांनी सांगितले. ज्या ठिकाणी रास्ता रोको सुरु आहे, अशा मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षता राज्य परिवहन महामंडळाकडून घेतली जात आहे. दरम्यान, सोलापुरात महापालिका परिवहनची बस फोडल्याने बसचे मार्ग बदलण्यात आले असून काही ठिकाणची बससेवा बंद करण्यात आली आहे. 

हेही आवश्‍य वाचाच : वळसे-पाटलांचे देवदर्शन अन्‌ कार्यकर्त्यांसमवेत बैठक 

 

ठळक बाबी... 

  • वंचित बहूजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला सोलापुरातून उत्स्फूर्त प्रतिसाद 
  • नवीपेठ, आसरा चौक, मंगळवार बाजार, टिळक चौक परिसरात शुकशुकाट 
  • चौकाचौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : वाहतूक पोलिसांचाही खडा पहारा 
  • महापालिकेची परिवहन व्यवस्था कोलमडली : अज्ञात आंदोलनकर्त्यांनी फोडली बस 
  • वंचित बहूजन आघाडीचा एनआरसीला विरोध : व्यापाऱ्यांनी नुकसानीच्या भितीपोटी दुकाने ठेवली बंद 

हेही आवश्‍य वाचाच : 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला हिसंक वळण : बसच्या फोडल्या काचा 

काही ठिकाणची सेवा बंद : पर्यायी मार्गाने वाहतूक 
महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर तरटी नाका परिसरात अज्ञातांनी बसची काच फोडली. त्यामुळे छत्रपती शिवाजी चौक, सम्राट चौक, बाळीवेस या ठिकाणची सेवा बंद ठेवण्यात आली असून पर्यायी मार्गाने बससेवा सुरु आहे. ग्रामीण भागातील बससेवाही सुरळीत सुरु असून प्रवाशांच्या सोयीसाठी आंदोलनकर्त्यांनी बसचे नुकसान करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 
- श्रीशैल लिगाडे, परिवहन व्यवस्थापक, सोलापूर महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur spontaneous response : transport system collapses at Maharashtra Band

फोटो गॅलरी