सोलापूरचा पारा 39.9 अंश सेल्सिअसवर 

प्रमोद बोडके
रविवार, 29 मार्च 2020

तीव्र उन्हाळ्याचे दोन महिने 
एप्रिल आणि मे महिन्यात सोलापूरचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे राहिले असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यंदाच्या उन्हाळ्यातही तशीच स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मार्च संपत असताना सोलापूरच्या तापमानाचा पारा आता 40 अंश सेल्सिअसच्या जवळ आला आहे. एप्रिल व मे हे दोन महिने सोलापुरातील तीव्र उन्हाळ्याचे असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

सोलापूर : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 39.9 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद आज सोलापूर शहर व परिसरात झाली. सोलापूरच्या तापमानाचा पारा आता 40 अंश सेल्सिअसकडे सरकू लागला आहे. दिवसभर प्रचंड उकाडा आणि उष्ण झळा यामुळे अंगाची लाही लाही होण्यास सुरवात झाली आहे. गेल्या आठवड्यात सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढल्यानंतर सोलापूर शहर व जिल्ह्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह तुफान हजेरी लावली होती. आता वाढत असलेल्या तापमानामुळे येत्या काळात पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/number-corona-patients-203-maharasrta-274997">हेही वाचा - काळजी घ्या...कोरोनाबाधित रुग्णांचे राज्यात द्विशतक 
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला संचारबंदीचा आदेश आणि पोलिस आयुक्तांनी काढलेला जमावबंदीचा आदेश यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील वाहतुकीची वर्दळ प्रचंड घटली आहे. कोरोनाची भीती आणि पोलिस रस्त्यावर फिरू देईनात आणि वाढते तापमान व उकाडा घरी बसू देईना अशीच काहीशी स्थिती सोलापुरातील नागरिकांची झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोलापूर शहर व परिसराचे तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले आहे. त्यामुळे वातावरणात धग अद्यापही कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur temperature at 39.9 degrees Celsius