काळजी घ्या...कोरोनाबाधित रुग्णांचे राज्यात द्विशतक 

तात्या लांडगे
रविवार, 29 मार्च 2020

  • मुंबईत 85 तर पुण्यात 37 रुग्ण कोरोनाबाधित 
  • सांगलीत 25 तर ठाण्यातील रुग्णांची संख्या 23 वर 
  • नागपुरात 14 तर यवतमाळ व नगरमध्ये नऊ रुग्ण बाधित 
  • साताऱ्यात दोन, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण 
  • आतापर्यंत आठ जणांचा झाला मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती 

सोलापूर : राज्यात आणखी 22 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता रुग्णांची संख्या 203 वर पोहचली आहे. नवीन रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक 10 तर पुण्यात पाच, नागपुरात तीन, नगरमध्ये दोन आणि सांगली, बुलडाणा व जळगावात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली आहे. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने नुकतीच दिली. 

हेही नक्‍की वाचा : गूड न्यूज...यवतमाळचे तीन रुग्ण झाले बरे 

राज्यात रविवारी (ता. 29) एकूण 394 जण विविध रुग्णालयात भरती झालेले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विविध विलगीकरण कक्षात आजपर्यंत चार हजार 210 जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी तीन हजार 453 जणांचे नमुने निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 203 जणांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 35 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 17 हजार 151 व्यक्‍ती घरगुती अलगीकरण कक्षात तर 960 व्यक्‍ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रणाची पूर्वतयारी म्हणून राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

हेही नक्‍की वाचा : लॉकडाउन अनिश्‍चित...पुढील आदेश येईपर्यंत लालपरी स्थानकातच 

बरे झालेल्या रुग्णांना लेखी प्रतिज्ञापत्र बंधनकारक 
राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 203 वर पोहचली आहे. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 35 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यांना पुढील 14 दिवस कुटुंबासह समाजातील कोणत्याही व्यक्‍तींच्या संपर्कात येणार नाही, असे लेखी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे. बरे होऊन घरी गेलेला रुग्ण घराबाहेर फिरताना दिसल्यास त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. पुढील 14 दिवस काय करायचे आणि काय करणार नाही, याबाबत त्यांच्याकडून लेखी घेण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of corona patients 203 in maharasrta