सोलापूर विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दणका 

तात्या लांडगे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

  • परीक्षा शुल्कात 10 टक्के वाढीचा निर्णय 
  • परीक्षा मंडळाची 25 फेब्रुवारीला बैठक 
  • 2022 मध्येच होणार परीक्षा शुल्क वाढीचे पुनरावलोकन 
  • परीक्षा शुल्क वाढीचे वातावरण तापणार : संघटनांनी केला विरोध 

सोलापूर : दुष्काळ, महापुरासह अन्य नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडत असतानाच आता बळीराजाच्या मुलांना ऑक्‍टोबरमध्ये परीक्षा शुल्क वाढीला सामोरे जावे लागणार आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने 10 टक्‍के शुल्क वाढीचा निर्णय घेतला असून त्यावर 25 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकी शिक्‍कामोर्तब होणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : वडिलानेच दिली मुलाच्या खूनाची सुपारी 

सर्वाधिक साखर कारखान्याचा जिल्हा, शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बळीराजाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणे कठीण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच रोजगाराचा शोध घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑक्‍टोबरमध्ये परीक्षा वाढीला सामोरे जावे लागणार आहे. मागील दोन वर्षात परीक्षा शुल्कात वाढ केली नसल्याने आता परीक्षा शुल्क वाढविले जाणार आहे. दरम्यान, परीक्षा शुल्कात दोन वर्षे वाढ करु नये, अशी मागणी युवा सेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल वानकर यांनी केली असून ते कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांना निवेदन देणार आहेत. 

हेही नक्‍की वाचा : डॉ. राजेंद्र भोसले झाले पुण्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त 

ऑक्‍टोबरमध्ये होणार शुल्कवाढ 
दरवर्षी परीक्षा शुल्कात 10 टक्‍के वाढ करावी असा ठराव विद्यापीठाने केला आहे. 2020 मध्ये त्याचे पुनरावलोकन होणार आहे. दरम्यान, मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत कोणतीही शुल्क वाढ केली जाणार नाही. परंतु, ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा शुल्कात वाढ करावी असा प्रस्ताव आहे. 
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ 

हेही नक्‍की वाचा : महापरीक्षा पोर्टल बंद ! 

ठळक बाबी... 

  • शैक्षणिक साहित्यांचा खर्च वाढल्याने परीक्षा शुल्कात वाढीचा निर्णय 
  • दरवर्षी परीक्षा शुल्कात 10 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचा विद्यापीठाचा ठराव 
  • ऑक्‍टोबरच्या परीक्षेपासून 10 टक्‍के परीक्षा शुल्क वाढीचा प्रस्ताव 
  • दरवर्षी परीक्षा शुल्क वाढीच्या विद्यापीठाच्या ठरावावर 2022 मध्ये होणार पुनरावलोकन 
  • परीक्षा शुल्क वाढ न करण्याची विद्यार्थी सेनेसह, युवा सेनेची मागणी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur University Decision to increase exam fee by 10 percent