थकीत ऊसबिलासाठी सोलापूरच्या स्वाभिमानीचे आंदोलन 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

आंदोलनाला मिळावी नवी जागा 
जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार हे आंदोलनकर्त्यांचे हक्काचे ठिकाण आहे. तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापुरात साखर सहसंचालक कार्यालय सुरू झाले आहे. कारखान्यांच्या प्रश्‍नासाठी आंदोलन करण्यास संघटना व कार्यकर्त्यांना आता नवीन जागा मिळाली असून कार्यालय सुरू झाल्यानंतर पहिलेच आंदोलन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी , विठ्ठल सहकारी, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी, गोकूळ शुगर, बबनराव शिंदे शुगर, विजय शुगर, शंकर सहकारी या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकविलेली ऊसबिले त्वरित मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज सोलापुरातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. 

aschim-maharashtra-news/solapur/akkalkot-taluka-sheep-got-rs-8-lakh-50-thousand-255072">हेही वाचा - बापरे! दीड वर्षाचा "राजा' साडेआठ लाखाला 
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यातील कामगारांच्या थकीत पगारी त्वरित अदा कराव्यात व विठ्ठलराव शिंदे कारखान्यांच्या वगळलेल्या 18 सभासदांना कायम सभासदत्व मिळावे या मागण्यांचा देखील आजच्या आंदोलनात समावेश होता. या आंदोलनाची दखल घेत साखर आयुक्तांनी मोहोळ तालुक्‍यातील भीमा सहकारी साखर कारखान्यावर आर. आर. सी. ची कार्यवाही केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली. उर्वरित मागण्या त्वरित निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. 
रणदिवे म्हणाले, साखर आयुक्तांनी फक्त आर. आर. सी. ची कार्यवाही केल्यानंतर महसूल विभागाने त्या कार्यवाहीचा कालबद्ध पाठपुरावा करावा. पंढरपूर तालुक्‍यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे या सहकारी साखर कारखान्यावर तत्काळ आर. आर. सी. करावी या कारखान्याने ऊसबिले दिल्याची खोटी माहिती दिली असून या कारखान्याने प्रशासन, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत या कारखान्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 
हेही वाचा - राजू शेट्टींनी राज यांच्या भूमिकेचे का केले स्वागत 
पंढरपूर तालुक्‍यातील सीताराम साखर कारखान्याच्या ऊसबिला संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालावर साखर आयुक्तांनी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. यावेळी यावेळी सोलापूर विभागाचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, माजी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिन पाटील, निवास भोसले, नरेंद्र पाटील, पप्पू पाटील, रणजित बागल, राहुल बिडवे, इक्‍बाल मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनासाठी सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur's swabhimani shetkari sanghtna strike for the shugarcane bil