सोलापुरात कम्युनिटी हॉस्पिटल अन्‌ किचन सुरू करा 

प्रमोद बोडके
Friday, 3 April 2020

केशरी कार्डधारकांच्या धान्यासाठी प्रयत्न 
जिल्ह्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा करून ठेवा. कमी पडत असल्यास आणखी मागवून घ्या अशी सूचना पालकमंत्री आव्हाड यांनी केली. केशरी कार्डधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य मिळत नसल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले. केशरी कार्डधारकांना धान्य मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि सचिव संजय खंदारे यांच्याशी चर्चा करू, केशरी कार्डधारकांना धान्य मिळण्यासाठी प्रयत्न करू असा विश्‍वास पालकमंत्री आव्हाड यांनी व्यक्त केला. 

सोलापूर : निराधार, स्थलांतरित मजुरांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्न उपलब्ध करून द्या. यासाठी स्वयंसेवी संस्था, साखर कारखाने, उद्योजक, व्यावसायिकांची मदत घ्या. पीपीई किट, सॅनिटायझर यांचा पुरेसा साठा सर्व शासकीय दवाखान्यात उपलब्ध करून घ्या. कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे का? याची चाचणी करणारी रॅपिड टेस्ट किट उपलब्ध करून घ्यावीत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात किमान एक कम्युनिटी क्‍लिनिक सुरू करा. या क्‍लिनिकसाठी खासगी डॉक्‍टरांना आवश्‍यक असणारी जागा, साहित्य आणि औषधे द्यावीत अशी सूचना सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. 
हेही वाचा - जेवण विकना झालयं...आता काय करावं 
पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते. 
हेही वाचा - शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सॅनिटायझरची निर्मिती 
पालकमंत्री आव्हाड म्हणाले, कम्युनिटी किचन व हॉस्पिटलसाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र निधी उभारण्यासाठी प्रयत्न करा. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरू ठेवण्याचेही त्यांनी आवाहन केले. कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी करावी लागली आहे. या काळात स्थलांतरित मजूर, गरीब आणि गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य पुरवठा होईल याची व्यवस्था करण्याची सूचनाही पालकमंत्री आव्हाड यांनी केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start a Community Hospital and Kitchen in Solapur