राज्य निवडणूक आयोगाची सूचना, ग्रामपंचायतीच्या प्रारुप मतदार यादीवरील हरकती स्वीकारण्यासाठी शनिवारी विशेष व्यवस्था करा 

प्रमोद बोडके
Friday, 4 December 2020

तालुकानिहाय एकूण हरकती 
करमाळा : 22, माढा : 24, बार्शी : 11, उत्तर सोलापूर : 24, मोहोळ : 35, पंढरपूर : 42, माळशिरस : 29, सांगोला : 19, मंगळवेढा : 15, दक्षिण सोलापूर : 42, अक्कलकोट : 26, एकूण : 289 

सोलापूर : महाराष्ट्रातील 14 हजार 233 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 डिसेंबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर या यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 10 डिसेंबरला अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

या प्रारुप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी 7 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. 5 डिसेंबरला शनिवार व 6 डिसेंबरला रविवारमुळे शासकीय सुटी आल्याने या सुट्टीच्या दिवशी हरकती स्वीकाराव्यात किंवा कसे? याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा केली जात होती. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचे स्पष्टीकरण दिले असून प्रत्येक जिल्ह्याने तालुक्‍याच्या ठिकाणी शनिवारी (ता. 5) कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी विशेष कक्षाची व्यवस्था करावी. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी ही सूचना केली आहे. 

त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर शनिवारी (ता. 5) देखील हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींसाठी प्रसिध्द केलेल्या प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादीवर आज अखेरपर्यंत 289 हरकती प्राप्त झाल्या आहेत. आज एकाच दिवशी तब्बल 226 हरकती प्राप्त झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Election Commission suggests, make special arrangements on Saturday to accept objections to the Gram Panchayat's draft voter list