लॉकाडाउन अनिश्‍चित : पुढील आदेश येईपर्यंत लालपरी जागेवरच 

तात्या लांडगे
रविवार, 29 मार्च 2020

  • लालपरीला दररोज 22 कोटी 17 लाखांचा फटका 
  • 22 मार्चपासून राज्यभरातील वाहतूक आहे बंद 
  • कर्मचाऱ्यांना सुट्टीत वेतन कसे द्यायचे, याची महामंडळाला लागली चिंता 
  • करारानुसार वेतन द्यावेच लागेल : कामगार संघटना आक्रमक मूडवर 
  • 14 एप्रिलपर्यंत नव्हे तर पुढील आदेश येईपर्यंत लालपरीची वाहतूक बंदच 

सोलापूर : एक लाख पाच हजार कर्मचारी असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता लॉकडाउनमुळे वेतनाची चिंता लागली आहे. दुसरीकडे महामंडळाला मिळणारे दररोजचे 22 कोटींचे उत्पन्नही बंद झाले आहे. त्यामुळे 1 एप्रिलचे वेतन आता लांबणीवर पडण्याची शक्‍यता असून 14 एप्रिलपर्यंत नव्हे तर पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक बंदच ठेवावी, असे शासनाने महामंडळाला स्पष्ट केले आहे. 

हेही नक्‍की वाचा : यवतमाळच्या कोरोनाबाधितांना बरे करण्यात सोलापुरच्या डॉक्‍टराचा योगदान 

खेड्यापाड्यातील नागरिकांच्या सोयीसाठी अहोरात्र झटणारी लालपरी आता कोरोनामुळे जागेवरच थांबली आहे. अडचणीतील महामंडळाला बाहेर काढण्याच्या हेतूने परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्पन्न वाढवा हे विशेष अभियान सुरु केले होते. एप्रिलपर्यंत हे अभियान राज्यभर राबविण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोना या विषाणूच्या संक्रमणाची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. महामंडळाच्या ताफ्यातील 17 हजार 600 बस 22 मार्चपासून स्थानकांमध्येच लावून आहेत. अडचणीतील महामंडळाच्या उत्पन्नात घट आणि नुकसानीतील लालपरीला बाहेर काढण्याचे सर्वोतोपरी नियोजन सुरु असतानाच लॉकडाउनमुळे महांमडळाला तब्बल 478 कोटींचा फटका सोसावा लागणार आहे. दुसरीकडे पगार बिले तयार करण्याची अडचण असल्याने कर्मचाऱ्यांना एप्रिलमध्ये वेतन मिळेल की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, महाराष्ट्र कामगार युनियनने मागील महिन्यातील पगारबिल ग्राह्य धरुन वेतन करावे, अशी मागणी लावून धरली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

हेही नक्‍की वाचा : आरोग्य यंत्रणा सलाईनवरच...राज्यात साडेचार हजार लोकांमागे एक डॉक्‍टर 

पगारबिल तयार झालेच नाही 
कोरोनाच्या वैश्‍विक संकटाचा यशस्वी मुकाबला करण्याच्या हेतूने देशभर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पगारबिले तयार करण्यास अडचणीत निर्माण झाल्या असून महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगारबिल अद्याप तयार झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या काळातील वेतन पूर्णपणे मिळणार का, कधीपर्यंत मिळणार या प्रश्‍नांवर महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे. 

हेही नक्‍की वाचा : घरातच बसा अन्यथा जेलमध्ये केली जाईल रवानगी : पोलिस आयुक्‍त 

पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक राहणार बंद 
र्कोरोनाच्या विषाणूला देशातून हद्दपार करण्यासाठी रेल्वे वाहतूक 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. तर राज्यातील एसटी बस पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवावी, असे राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला स्पष्ट केले आहे. त्यामुळे 14 एप्रिलनंतर बससेवा सुरु होईल की नाही, याबाबत आता काहीच सांगता येणार नसल्याचे महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक राहूल तोरो यांनी सकाळशी बोलताना स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stay at the bus station until further orders