
सोलापूरः कोविडच्या कालावधीनंतर अजुनही ऑटो व्यवसाय विस्कळित असल्याने ऑटो खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थाच्या प्रतिनिधींनी कर्जवसुलीसाठी चालवलेली अरेरावी, दमदाटी व वाहन जप्तीची कारवाई थांबवत डिसेंबर महिन्यापर्यंत कर्जाचे हफ्ते थांबवावेत अशी मागणी सीटू रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
हेही वाचाः सोलापूर बाजारसमितीत कांदा सात हजारांवर
शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे सन 2017 ते 2020 या कालावधीत सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 7000 ऑटो रिक्षांची नव्याने नोंदणी झाली. नवीन नोंदणी झालेल्या बहुतेक रिक्षा या विविध वित्तीय कंपन्यांच्या वाहन कर्ज पुरवठ्यावर खरेदी केल्या गेल्या आहेत.या वित्तीय कंपन्याकडून वाहन कर्जावर एकच स्थिर व्याज आकारणी (फ्लॅट रेट) नुसार रिक्षा चालक सदर कर्जाचा भरणा नियमितपणे करत आले आहेत.
कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्च2020 पासून ऍटो व्यवसाय ठप्प झाला असून रिक्षा चालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेने लॉकडाउन काळातील कर्ज वसुलीस चार महिने स्थगिती दिली. यानंतर अनलॉकच्या काळातही प्रवाशी वाहतुकीवर अनेक निर्बंध असल्याने प्रवाशी वाहतुकीचा व्यवसाय पूर्वपदावर आलेला नाही. अशा परिस्थितीत वित्तीय कंपन्यांचे वसुली अधिकारी व प्रतिनिधी वाहन कर्ज घेतलेल्या रिक्षा चालकांना दिवसातून अनेक वेळा फोन करणे, घरी जाऊन घरातील लोकांना कर्ज भरण्यासंबंधी सूचना देणे, रिक्षा थांब्यावर जाऊन कर्ज वसुलीसाठी रिक्षा चालकास अरेरावीची भाषा करणे, वाहन जप्त करून घेऊन जाण्याची धमकी देणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्याची तक्रार कांही सजग रिक्षा चालकांनी लाल बावटा रिक्षा चालक संघटनेकडे केली.
सदर तक्रारीची दखल घेऊन रिक्षा चालक संघटनेचे उपाध्यक्ष आरिफ मणियार व जनरल सेक्रेटरी सलीम मुल्ला यांनी कर्जपुरवठादार वित्तीय कंपनीच्या वसुली कार्यालयास शिष्टमंडळासह भेटून चर्चा केली व त्यांना संघटनेच्या वतीने निवेदन सादर केले. सध्या सुरु असलेली कर्ज वसुलीची कारवाई व कर्जदारावर होत असलेली अरेरावी हि पूर्णपणे बेकायदेशीर व अनुचित प्रथेचा अवलंब करणारी आहे. सोलापुरातील व्यवसायाची परिस्थिती लक्षात घेता डिसेंबर 2020 अखेर पर्यंत कर्जाच्या वसुलीकरिता तगादा लावू नये व वसुली प्रतिनिधीना कर्जदाराशी सौजन्याने वागण्याचे निर्देश देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सोलापुरात जवळपास 7000 पेक्षा जास्त रिक्षा चालक हे वाहन खरेदी कर्जाचे कर्जदार असून अनेक ठिकाणी अशी बेकायदेशीर प्रकार होत असल्याने व वित्तीय संस्थेच्या प्रतिनिधीच्या सततच्या तगाद्याने व अरेरावीला कंटाळून कांहीतरी अघटीत घडण्याची शक्यता आहे. या बाबत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर व महाव्यवस्थापक बजाज ऑटो फायनान्स कंपनी पुणे यांना निवेदने सादर केली. वित्तीय संस्थेच्या कर्ज वसुलीच्या कारवाई बाबत वित्तीय संस्थांची बैठक घेऊन शासनाच्या नियम व निर्देशाचे पालन करून डिसेंबर 2020 अखेरनंतर कर्ज वसुलीस सुरुवात करावी अशी मागणी सीटू रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
शहरातील ऑटो व्यवसायाची स्थिती
वर्ष 2017 पासून 7000 ऑटोची खरेदी
सर्वच ऑटो खरेदीसाठी कर्जपुरवठा
कमाई नसल्याने कर्जाचे हफ्ते भरणे अशक्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.