कहाणी एका जिद्दी "सु'यशाची अन्‌ न दमलेल्या बापाची; मुलाची अर्जुन पुरस्काराला गवसणी !

Suyasha Jadhav.
Suyasha Jadhav.

वेळापूर (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील वेळापूर कर्मभूमी असलेला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जलतरणपटू, महाराष्ट्राचे क्रीडा अधिकारी सुयश जाधव यांनी सोलापूर जिल्ह्यातील पहिले अर्जुन पुरस्कार विजेते म्हणून नाव कोरले आहे. अतिशय सामान्य परिस्थितीत आंतरराष्ट्रीय झेप घेणाऱ्या सुयशची कहाणी शब्दशः फिनिक्‍स भरारीच आहे. 

अर्धनारी नटेश्वराची नगरी म्हणून सर्वदूर परिचित असणारे वेळापूर एक गाव. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावरील मुक्कामाचे ठिकाण म्हणूनही हे गाव परिचित आहे. या वेळापूरला एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून देण्याची कामगिरी करणारा सुयश जाधव हा वेळापूर गावाचाच नव्हे तर देशाचा आयकॉन बनला आहे. सुयश जाधव हा इंग्लिश स्कूल वेळापूरमधील शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित नारायण जाधव यांचा सुपुत्र. जाधव परिवार हा मूळचा भाळवणी (ता. करमाळा) इथला. 

हेही वाचा : स्वत:चे शिक्षण सोडून बहिणीला शिकवले, पण शहीद सैनिकाचे अधुरेच राहिले स्वप्न 

जन्मभूमी करमाळा असली तरी वेळापूर ही जाधव पिता-पुत्रांची कर्मभूमी आहे, असे दोघेही सांगतात. गेली काही दशके वेळापूर खो-खोच्या निमिताने क्रीडा विभागास सुपरिचित आहे. त्यामध्ये नारायण जाधव यांचा मोठा वाटा राहिला आहे. हेच ते नारायण जाधव सर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर येथील दोन खेळाडू जावेद आतार आणि अजय कश्‍यप खो-खोमधील सर्वोच्च भरत ऍवॉर्डचे मानकरी ठरले. त्याचे फलित म्हणूनच गतवर्षी महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने त्यांना क्रीडा मार्गदर्शक म्हणून सन्मानित केले गेले. आणखी एक दुग्धशर्करा दुर्मिळ योग म्हणजे याच वर्षी उत्कृष्ट जलतरणपटू सुयश जाधवही शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी ठरला. या पिता-पुत्राला एकाच वेळी महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले. एकाच पुरस्काराने एकाच व्यासपीठावरून पिता-पुत्राला महाराष्ट्राच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित झाल्याचे महाराष्ट्रातील हे एकमेवाद्वितीय उदाहरण आहे. 

संकटेसुद्धा संधी घेऊन येतात. गरज असते ती संधी शोधण्याची, तरच "सुयश' मिळू शकते. सुयश लहान असताना विजेच्या धक्‍क्‍याने त्याचे दोन्ही हात निकामी झाले. भविष्य अंधःकारमय असताना पिता-पुत्र दुःख कवटाळत न बसता कामाला लागले. त्यासाठी त्यांनी निवडले जलतरण क्षेत्र. पाहता पाहता सुयश यशाचे एकेक शिखर सर करीत गेला. राष्ट्रीय - आंतराष्ट्रीय स्पर्धेत 125 पेक्षा अधिक पदके मिळवणाऱ्या सुयशला गत पॅरा ऑलिंपिकमध्ये पदकाने थोडक्‍यात हुलकावणी दिली.

अपयशच यशासाठी प्रेरणा देते. सुयश अपयशाने न खचता यावर्षी जकार्तामध्ये (इंडोनेशिया) आशियाई पदक मिळवण्यासाठी सज्ज झाला. अन्‌ भारतासाठी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पॅरा आशियाई स्पर्धेत तब्ब्ल तीन पदके पटकावली. 50 मीटर बटरफ्लायमध्ये 32.71 सेकंदांची वेळ नोंदवून भारताच्या खात्यात सुवर्णपदक मिळवून दिले. तर 50 मीटर फ्री आणि 200 मीटर स्पर्धेत ब्रॉंझ पदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली. दोन्ही हात गमावल्यानंतर सुयशने राज्य स्तरावर 50 सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर 37 सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर सात सुवर्ण पदकांसह आजवर 111 पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्र शासनाने सुयशला शिवछत्रपती पुरस्कारासह जलतरण क्रीडा मार्गदर्शक अधिकारी वर्ग एक, बालेवाडी पुणे येथे संधी देऊन बहुमान केला आहे. 

हे देदीप्यमान यश मिळवलेला सुयश म्हणतो, जलतरणातील यशात माझे मार्गदर्शक तपन पाणिग्रही, माझे पहिले गुरू वडील नारायण जाधव यांचे अचूक व नेमके मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ देणारे नेतेगण, वेळापूर व सोलापूर जिल्ह्यातील मित्रांचे मदतीचे व प्रेरणेचे हात आदींच्या अनमोल सहकार्यानेच हे "सुवर्ण' क्षण पाहता आले. 

सुयशचे क्रीडा मार्गदर्शक, भारतीय क्रीडा जलतरणचे निवृत्त अधिकारी तपन पाणिग्रही सुयशबद्दल अभिमान व्यक्त करताना म्हणतात, सुयश हा आशियाई द्वीप समूहातील देशांचा (48 पैकी 43 सहभागी देश) "फास्टेस्ट स्वीमर' ठरला आहे. मी सुयशचा मैदानावरील मार्गदर्शक आहे, पण मैदानाबाहेरील अनेकांचे यशात योगदान आहे. 

भारतीय जलतरणच्या क्षितिजावरील उगवलेला "सूरज' ग्रामीण भागातील युवा खेळाडूंचा "आयकॉन' ठरला आहे. शरीराने "अनफिट' फिट दिसलो तरी मनाने अन्‌ कर्तृत्वाने "फिट' असल्याचा प्रत्यय सुयशने या प्रवासात वारंवार दिला आहे. एवढ्या यशावर न थांबता भविष्यातही देशासाठी सुवर्ण कामगिरी करण्याची सुयशची जिद्द आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com