कारखानदारांना आगामी गाळप हंगामाची आतापासूनच चिंता

तात्या लांडगे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पुढच्या हंगामात मुबलक ऊस 
राज्यात यंदा साखर उत्पादन घटले असून आगामी हंगामात मुलबक प्रमाणात ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. परंतु, आडसाली व पूर्वहंगामी लागवड कमी झाली असून आता लागवड केली जात आहे. आतापर्यंत दहा ते बारा कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. 
- दत्तात्रय गायकवाड, सहसंचालक, साखर आयुक्‍तालय, पुणे 

सोलापूर : कोल्हापूरसह राज्यातील महापूर, मागील वर्षीचा दुष्काळ, खोलवर गेलेली पाणी पातळी, उत्पादनात झालेली घट अन्‌ कारखान्यांकडून एकरकमी न मिळणारी एफआरपी या कारणांमुळे मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडीत सहाशे ते सातशे हेक्‍टरपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे सध्याचा गाळप हंगाम संपण्यापूर्वीच कारखानदारांना आगामी हंगामाची चिंता वाढली आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात 471 लाख क्‍विंटलची घट झाल्याचेही सांगण्यात आले. 

हेही वाचा - राज्यातील साडेनऊ हजार शिक्षकांना दिलासा 

सध्या सुरु असलेल्या गाळप हंगामात राज्यातील 143 कारखाने सुरु झाले होते. त्यापैकी औरंगाबाद विभागातील सहा, नगर विभागातील तीन तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एक कारखाना बंद झाला आहे. आतापर्यंत 386 लाख मे.टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले असून त्यातून 417 लाख क्‍विंटल साखर उत्पादित झाली आहे. आता 20 ते 25 दिवसांत बहूतांश कारखाने बंद होतील, अशी शक्‍यता आहे. दरम्यान, सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर, कोल्हापूर, नगर जिल्ह्यांमध्ये आडसाली व पूर्वहंगामी उसाची लागवड अत्यल्प झाली आहे. जानेवारी- फेब्रुवारीत उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पुढील गाळप हंगाम लांबणीवर पडणार आहे. मागील दोन वर्षाची साखर शिल्लक असल्याने साखरेचे दर स्थिर राहतील, असा अंदाजही आयुक्‍तालयाने व्यक्‍त केला आहे. 

हेही वाचा - शाळा अनुदानाचा विषय मेपूर्वी संपणार 

राज्याची स्थिती 

  • एकूण ऊस गाळप : 386 लाख मे. टन 
  • साखर उत्पादन : 417.26 लाख क्‍विंटल 
  • बंद झालेले कारखाने : 10 
  • आडसाली, पूर्वहंगामी ऊस लागवडीत घट : 470 हेक्‍टर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar industry worry about the upcoming sugarcane season from now