अवैध सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

20 मे रोजी बांधकाम सुरू असलेल्या स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसून तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल ननावरे करीत आहेत. 

बार्शी (सोलापूर) : शहरातील शिवशक्ती मैदान परिसरात राहणाऱ्या देवेंद्र सासवडे (वय 50) यांनी स्वतःचे घर विकून सावकारांचे मुद्दल व व्याजाच्या पैशाची परतफेड केली. सावकारांनी अजून व्याजाचे पैसे द्यावेत म्हणून मानसिक छळ केल्याने त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तीन अवैध सावकारांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा : लाॅकडाउनचा इलेक्ट्रीक व्यवसायाला बसला शाॅक

व्यवसाय आर्थिक अडचणीत 
कपील ऊर्फ संजय कुलकर्णी (रा. बावी आ.), शेखर गरड (रा. हांडे गल्ली), श्रीकांत पाटील, मधुकर पाटील (दोघे रा. दत्तनगर), विकी खलसे (रा. म्हाडा कॉलनी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वैशाली सासवडे यांनी फिर्याद दाखल केली. 
हांडे गल्ली येथे देवेंद्र सासवडे यांचा अनिरुद्ध ऑपसेट प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय होता. व्यवसाय आर्थिक अडचणीत आल्याने पतीने कपील कुलकर्णी याच्याकडून सात टक्के व्याजाने तीन लाख, शेखर गरड याच्याकडून पाच टक्के व्याजाने 50 हजार, विकी खलसे याच्याकडून पाच टक्के व्याजाने 40 हजार रुपये घेतले होते. 

हेही वाचा : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात द्राक्ष वेलींच्या सहाय्याने मनमोहक सजावट

राहत्या घराचीही विक्री 
तिघे जण दरमहा घरी येऊन व्याजाचे पैसे घेऊन जात असत. पती देवेंद्र यांना कासारगल्ली येथील जुने राहते घराची विक्री करा तुम्हाला ग्राहक देतो असे सांगून श्रीकांत पाटील यांच्यासोबत 11 लाख रुपयांना व्यवहार ठरवला. 21 जानेवारीला घराचे खरेदीखत केले. घराचे 10 लाख येताच सर्वांचे मुद्दल रक्कम देण्यात आली. घराचे उर्वरित एक लाख रुपये पाटील यांनी दिले नाहीत तर तीन सावकारांनी आमचे अजून व्याज व पैसे तुझ्याकडून येणेबाकी आहेत, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करीत होते. मानसिक छळाला कंटाळून देवेंद्र सासवडे यांनी 20 मे रोजी बांधकाम सुरू असलेल्या स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसून तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल ननावरे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide after getting fed up with illegal moneylenders