को-मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे झाला बंद ! शहरात दोन दिवसांत पाच मृत्यू 

तात्या लांडगे 
Friday, 13 November 2020

दिवाळीनिमित्त शहरात को-मॉर्बिडचा सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना 20 नोव्हेंबरपर्यंत सुटी देण्यात आली आहे. एप्रिलपासून सातत्याने नोव्हेंबरपर्यंत काम केल्यानंतर दिवाळीसाठी सुटी देण्याची मागणी शिक्षकांनी केली होती. त्यानंतर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सुटी देण्याचे आदेश काढले. त्यानंतर शहरातील को-मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे पूर्णपणे बंद झाला आहे. 

सोलापूर : दिवाळीनिमित्त शहरात को-मॉर्बिडचा सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना 20 नोव्हेंबरपर्यंत सुटी देण्यात आली आहे. एप्रिलपासून सातत्याने नोव्हेंबरपर्यंत काम केल्यानंतर दिवाळीसाठी सुटी देण्याची मागणी शिक्षकांनी केली होती. त्यानंतर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सुटी देण्याचे आदेश काढले. त्यानंतर शहरातील को-मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे पूर्णपणे बंद झाला आहे. दरम्यान, शहरात मागील दोन दिवसांत पाच को-मॉर्बिड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

शहरात सणासुदीत बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे रॅपिड अँटिजेन टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. दरम्यान, कमी झालेले मृत्यू पुन्हा वाढत असल्याने चिंता व्यक्‍त होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असतानाही को- मॉर्बिड रुग्णांच्या सर्व्हेसाठी शिक्षकांशिवाय महापालिकेकडे मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

शहरात सुमारे 20 हजारांहून अधिक को- मॉर्बिड रुग्ण असून त्यापैकी 400 हून अधिक रुग्णांचा कोरोनाने आतापर्यंत बळी घेतला आहे. दिवाळीनंतर म्हणजेच 21 ऑक्‍टोबरनंतर पुन्हा नियमित कामकाज सुरू केले जाणार असून, सुटीवर गेलेल्या शिक्षकांना 30 दिवसांची ड्यूटी करावीच लागेल, असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

डिसेंबरमध्ये दुसऱ्या लाटेचा सर्व्हे 
शहरातील को- मॉर्बिड (पूर्वीचे आजार असलेल्या व्यक्‍ती) रुग्णच कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरले आहेत. त्यांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी 21 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर दरम्यान पहिला सर्व्हे पार पडला आहे. तर 14 ते 25 ऑक्‍टोबर या काळात दुसरा सर्व्हे करण्यात आला. आता दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या सर्व्हेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तो सर्व्हे केला जाणार असून, त्यासाठी शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. घरोघरी जाऊन को- मॉर्बिड रुग्णांची ऑक्‍सिजन लेव्हल, तापमान लेव्हल मोजली जाईल. त्यांच्यावर वॉच ठेवला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The survey of co-morbid patients was stopped as teachers were given Diwali leave