
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील भीमनगर येथे राहणारे उदय सोनकांबळे हे स्वतः कोरोनाबधित निघाले... दोन दिवस भीतीत गेल्यानंतर कोव्हिड सेंटर येथे येणाऱ्या 50 कोरोनाबधित रुग्णांना मानसिक आधार देऊन धैर्य देणारे व स्वतः राहण्याची खोली स्वतःच स्वच्छ करून घेणारे व कोव्हिड सेंटरची स्वच्छता करून कमी होऊन परतत असताना चाळीस जणांना फळे वाटलेले पाहिले तर त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
याची अधिक माहिती अशी, की सार्वजनिक बांधकाम उपअभियंता वाहनावर चालक म्हणून काम करणारे उदय यांची सेवा कोरोना काळात उत्तर ठाण्यात वर्ग झाली होती. सलग तीन महिने काम केल्यानंतर अचानक त्यांना त्रास जाणवू लागला होता. मुळात त्यांना उच्च रक्तदाब व शर्करेचे आजार असल्याने ते घाबरले. कारण, या आजाराच्या लोकांना कोरोना झाल्यास त्रास होतो हे त्यांना माहिती होते. त्यांनी श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर स्वतः होऊन स्वॅब दिला आणि ते कोरोनाबधित झाले. त्यांच्या मनात भीती घर केल्याने त्यांनी घाबरत कोव्हिड सेंटरमध्ये प्रवेश केला आणि त्यांना मानसिक आधार देणारे एक-दोघे वगळता कोणीही भेटले नाहीत. कसेबसे त्यांनी दोन दिवस उपचार करून घेत काढले आणि तिसऱ्या दिवसापासून आजार कमी होत असल्याचे जाणवले. तेव्हा त्यांनी ठरवले, की आता इतरांना मदत केली पाहिजे...
आणि त्याप्रमाणे ते कोव्हिड केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाला धैर्य व आधार देण्याचे काम करू लागले. त्याचबरोबर स्वतःची खोली स्वच्छ करून घेणे तसेच प्रत्येक कोरोनाबधित रुग्णास मानसिक बळ यावे यासाठी समजावून सांगितले. त्यामुळे रुग्ण हे तणावरहित दिसू लागले. प्रत्येक रुग्णाच्या मनातील भीती दूर करणे, कुणालाही काही होणार नाही, चिंता करू नका, अशी खात्री देण्याचे काम त्यांनी केले. आणि साऱ्या गोष्टी प्रशासनच करायला पाहिजेत, हे मनात न आणता कोव्हिड सेंटर परिसर स्वच्छता सुरू केली. सर्व केरकचरा स्वतः काढायला सुरू केली. हे पाहून इतर तीन-चार कोरोनाबधित रुग्णमित्र मदतीला आले. हे पाहून त्यांनाही बरे वाटले. शेवटी घरी परत येताना पोलिस निरीक्षक कलप्पा पुजारी, रिपाइं (आ)चे अविनाश मडिखांबे व महिबूब मुल्ला यांच्या उपस्थितीत 40 रुग्ण व कर्मचाऱ्यांना फळे वाटून निरोप घेतला. कोरोनाबधित झाल्यानंतर आपल्या स्वतःची ओळख न लपविता एक वेगळा संदेश देणारा अवलिया उदय सोनकांबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत उदय सोनकांबळे म्हणाले, अक्कलकोटला स्वामींचे पुण्यस्थान आहे म्हणून जन्मेजयराजे भोसले यांनी अन्नछत्र मंडळाची निर्मिती केली. ते आम्हा रुग्णांना कामी आले. अमोलराजे भोसले यांनी रुग्णांची निवास व जेवण याची चांगली व्यवस्था केली, याचा आम्हाला अभिमान वाटला. इतर रुग्णांनी प्रशासनावर विसंबून न राहता काही गोष्टी स्वतःही करून घ्याव्यात, जेणेकरून ताण कमी होईल.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.