ऑनलाइन शिक्षणात शिक्षिकाच लई भारी! "एवढ्या' विद्यार्थ्यांच्या घरांपर्यंत पोचविले शिक्षण 

Online education
Online education

सोलापूर : कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणात विशेष काम केलेल्या 15 शिक्षकांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये सहा शिक्षिका आणि नऊ शिक्षकांचा समावेश आहे. कोरोनामुळे "शाळा बंद अन्‌ ऑनलाइन शिक्षण सुरू' या उपक्रमातून तंत्रस्नेही शिक्षकांनी सुमारे सात ते आठ हजार विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत ऑनलाइन शिक्षण पोचविले आहे. ज्या पालकांकडे अँड्राईड मोबाईल नाहीत, त्यांच्यासाठी गृहभेट उपक्रम राबविला जात आहे. कौटुंबिक जबाबदारी पार पाडून कोविड योद्धा म्हणून काम केलेल्या या शिक्षिका विद्यार्थ्यांसह पालकांना कोरोना जनजागृतीचे धडे देत आहेत. 

झूम ऍप, मायक्रोसॉफ्ट टिम्स्‌ ऍप, दीक्षा ऍप, गूगल मीट याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शिक्षण पोचविण्यात सोलापुरातील शिक्षक यशस्वी ठरले आहेत. महापालिका शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत स्वाध्याय संच पोचविले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेचे बजेट अद्याप न झाल्याने त्याचा संपूर्ण खर्च शिक्षक स्वत: भागवीत आहेत. पहिली ते आठवी, दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर स्वाध्यायमाला, प्रश्‍नसंच, गृहभेट, ज्ञान की बात, दैनिक व साप्ताहिक अभ्यासमाला असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. ऑनलाइन शिक्षणाला मुले कंटाळणार नाहीत, याचीही दक्षता या शिक्षक-शिक्षिका घेत आहेत. 

ऑनलाइन शिक्षणात विशेष योगदान दिलेले शिक्षक 
महापालिका शिक्षण मंडळाच्या यादीत विशाल मनाळे (महापालिका मुलींची शाळा क्र. तीन), गीता सादूल (भू. म. पुल्ली कन्या प्रशाला), प्रज्ञा बोधे (मॉडर्न प्राथमिक शाळा), ए. आर. घोंगडे (चतुराबाई श्राविका शाळा), शिवकन्या कदरकर (मॉडर्न हायस्कूल), नाजनीन कोरबू (महापालिका उर्दू कॅम्प प्रशाला), नागऋषी परिमल्ला, भास्कर मदनलाल (महापालिका तेलुगु शाळा क्र. एक), राजकिरण चव्हाण (समर्थ विद्या मंदिर), तानाजी माने, आनंद कोळी (शरदचंद्र प्रशाला), संतोष सुतार (महापालिका मुले शाळा क्र. दोन), माधुरी थोंटे (सिद्धेश्‍वर बालक मंदिर), सुचिता मदने (सिद्धेश्‍वर प्राथमिक शाळा) व कृष्णपरमेश्‍वर सुतार (महापालिका मुलांची शाळा क्र. 28) यांचा समावेश आहे. 

ठळक बाबी... 

  • महापालिकेच्या शिक्षण मंडळाला हवा आहे 50 लाखांचा निधी 
  • चिनी झूम ऍपचा वापर अनेक शिक्षकांनी जाणीवपूर्वक टाळला 
  • कोरोनाची ड्यूटी करीत शिक्षक-शिक्षिकांनी जोपासली विद्यार्थ्यांची शिक्षणाची गोडी 
  • रांगोळी, मी कोरोना योद्धा, वृक्ष लागवड व जतन, संगीत, गायन अशा स्पर्धांचेही आयोजन 
  • व्हॉट्‌सऍप, दूरध्वनी कॉलवरून पालकांशी नियमित साधला जातोय संवाद 
  • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आठवड्याला मांडला जातो लेखाजोखा 

"मायक्रोसॉफ्ट टिम्स्‌' याद्वारे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्‍लासेस 
सौ. भू. म. पुल्ली कन्या प्रशालेच्या प्राचार्या गीता सादूल म्हणाल्या, पाचवी ते दहावीपर्यंतच्या एक हजार 436 विद्यार्थ्यांना कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. त्यासाठी रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून प्रशालेने "मायक्रोसॉफ्ट टिम्स्‌' याद्वारे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्‍लासेस घेतले जात आहेत. सकाळी सहा ते आठ आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. 

ऑनलाइन शिक्षण दिल्याने प्रगतीत सातत्य 
मॉडर्न प्राथमिक शाळेच्या प्रज्ञा बोधे म्हणाल्या, मुलांची शिक्षणाची गोडी कायम राहावी म्हणून त्यांनी सर्वप्रथम पालकांना या शिक्षणात सहभागी करून घेतले आहे. बदलत्या काळात बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून आता मुले व पालकांचाही ऑनलाइन शिक्षणात सहभाग वाढला आहे. रांगोळी, चित्रकला, मी कोरोना योद्धा असे उपक्रमही घेत आहे. तिसरीतील मुलांना जुलैपासून दररोज ऑनलाइन शिक्षण दिल्याने प्रगतीत सातत्य आहे. 

गृहभेट उपक्रमातून पोचविला स्वाध्याय संच 
महापालिका उर्दू कॅम्प शाळेच्या नाजनीन कोरबू म्हणाल्या, महापालिकेच्या उर्दू कॅम्प शाळेत पहिली ते सातवीपर्यंत 102 मुले आहेत. बहुतांश पालकांकडे अँड्राईड मोबाईल नाहीत. त्यामुळे गृहभेट उपक्रमाच्या माध्यमातून स्वाध्याय संच त्यांच्यापर्यंत पोच करण्यात आला. पहिली, दुसरीतील मुलींना दररोज अर्धा तास, तर तिसरी ते सातवीपर्यंतच्या मुलींना 15 मिनिटांच्या फरकाने दररोज दोन तास ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. 

ज्ञान की बात हा उपक्रम राबविला जातो 
सिद्धेश्‍वर प्राथमिक शाळेच्या सुचेता मदने म्हणाल्या, पहिली ते चौथीपर्यंत 850 विद्यार्थी आहेत. चौथीच्या मुलांसाठी मनपा प्राथमिक मंडळाचा ज्ञान की बात हा उपक्रम राबविला जात आहे. तर पहिली ते चौथीच्या मुलांसाठी साप्ताहिक अभ्यासमाला हा उपक्रम घेतला जात आहे. स्वाध्याय संच मुलांपर्यंत पोच करून तो सोडवून घेतला जात आहे. तर अँड्राईड मोबाइल असलेल्यांसाठी व्हॉट्‌सअप, यू-ट्यूबच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. 

सरकारच्या तंत्रस्नेही समूहानेही घेतले व्हिडीओ 
चतुराबाई श्राविका प्रशालेच्या ए. आर. घोंगडे म्हणाल्या, प्रशालेतील पाचवी ते सातवीपर्यंतच्या 150 मुलांना ऑनलाइनच्या माध्यमातून मी स्वत: इंग्रजी विषयाचे व्हिडीओ तयार करून त्यांना पाठविते. मी तयार केलेले बहुतेक व्हिडीओ राज्य सरकारच्या तंत्रस्नेही समूहानेही घेतले आहेत. मुलांची ऑनलाइन टेस्टही घेतली जाते. त्यामध्ये चांगले गुण घेणाऱ्यांना ई-प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे बहुतेक पालक त्यांच्या मुलांकडे लक्ष देऊ लागले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com