
सोलापूरः जिल्ह्यात शेतीचा कल ऊस पिकाकडे सातत्याने वाढत आहे. ऊस पिकाची लागवड करत असताना जमिनीचे बदलते रासायनिक समीकरण समजून घेत शेतजमिनी क्षारपड होण्याचा प्रश्न पुढील काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यासमोर मृदा तपासणीसह लिफ पेटीओल ऍनालिसीस, कस्टमाईज फर्टिलायझर हे क्षारपडीच्या प्रश्नावर महत्त्वाचे ठरणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. यामुळे जिल्ह्यात एकूण 38 साखर कारखाने सुरू आहेत. उसाची लागवड करत असताना शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यात ऊस पीक घेतल्या जाणाऱ्या जमिनीचे क्षारपडीचे निर्माण झालेले प्रश्न लक्षात घेण्याची गरज आहे. उसाच्या अधिकाधिक उत्पादनासाठी रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे सलग उसाचे पीक तीन वर्षापेक्षा अधिक काळ घेतले, तर हे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांना माती तपासणीच्या अहवाला आधारे जागरूक राहाणे शक्य होणार आहे. याबाबत मृदा तपासणीशिवाय इतर अनेक नवीन संशोधने शेतकऱ्यांच्या मदतीला आली आहेत.
खतांचा अभ्यासपूर्ण वापर व्हावा
शेतीच्या मृदा तपासणी (जमिनीची आरोग्यपत्रिका) केली, तर जमिनीत असलेली मूलद्रव्यांची उपलब्धता लक्षात घेता येते. उपलब्ध असलेली मूलद्रव्ये पुन्हा खताद्वारे दिली जाऊ नयेत. याबाबत जनजागृती नसल्याने भरमसाठ रासायनिक खते जमिनीत टाकली जातात. त्याचा परिणाम म्हणून जमीन क्षारपड होण्यास सुरुवात होते. काही वर्षानंतर जमीन नापिक बनते. हे टाळण्यासाठी फक्त जमिनीत कमी असलेली व पिकांना लागणारीच मूलद्रव्ये खतामधून मिळतील, याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
लिफ पिटीओल ऍनालिसीस
जमिनीतून पिकांनी नेमकी कोणती मूलद्रव्ये शोषून घेतली आहेत. त्याचा अभ्यास लिफ पिटीओल ऍनालिसिस म्हणजे देठांच्या तपासणीद्वारे करता येतो. जमिनीतून पिकांना मिळणाऱ्या मूलद्रव्यांच्या आकडेवारीवरून खताचा नेमका किती उपयोग पिकांना होतोय, याचे विश्लेषण करता येते.
कस्टमाईज फर्टिलायझर
कोणत्या पिकाला नेमका कोणते मूलद्रव्य अधिक किंवा कमी लागते. याबाबत कस्टमाईज फर्टिलायझरद्वारे नियोजन करता येते. पिकांच्या मूलद्रव्याची गरज व जमिनीतील उपलब्धता, यावर खतांचे नियोजन करता येते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काय करावे
- उसाचे पाचट शेतात कुजण्यासाठी टाकावे
- हिरवळीच्या खताचा वापर करावा
- जमिनीतील सेंद्रीय कर्ब तपासून ते वाढवणे आवश्यक
- दरवर्षी पिकात बदल करणे गरजेचे
- नवीन संशोधनाचा उपयोग करणे आवश्यक
जागरुकता येणे महत्वाचे
ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मृदा तपासणी व इतर बाबीबद्दल अधिक जागरुकता येणे गरजेचे आहे. त्याशिवाय क्षारपडीचा प्रश्न टाळता येणे शक्य होत नाही.
-अनिता ढोबळे, -सचिव, श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.