मंगळवेढा तहसीलदारांनी केली चक्क होडीने जाऊन वाळू माफियांवर कारवाई ! 3.50 लाखांचा मुद्देमाल जप्त 

हुकूम मुलाणी 
Friday, 1 January 2021

माण नदी पत्रातील मुढवी येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर महसूल व पोलिस पथकाने संयुक्त केलेल्या कारवाईत अनधिकृतपणे वाळू उत्खनन करणाऱ्या होडींवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (ता. 1) सकाळी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी चक्क होडीतून जाऊन केली. 

मंगळवेढा (सोलापूर) : माण नदी पत्रातील मुढवी येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर महसूल व पोलिस पथकाने संयुक्त केलेल्या कारवाईत अनधिकृतपणे वाळू उत्खनन करणाऱ्या होडींवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (ता. 1) सकाळी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी चक्क होडीतून जाऊन केली. 

कोरोनाच्या संकटापासून महसूल व पोलिस खाते लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात गुंतले आहे. दोन्ही खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे ही संधी साधत वाळू तस्करांनी नदीकाठी बेकायदा वाळू उपसा करण्यास सुरवात केली. तरीही पोलिसांना दररोज वाळू उपसा करणारी वाहने मंगळवेढा शहरालगत सापडत होती. तर काही वाळू माफियांनी पोलिसांना चकवा देऊन वाळू वाहतूक करून मोठी आर्थिक माया जमा केली. त्यामुळे कारवाईला जुमानेसे झाले. त्यामुळे घरकुल व इतर बांधकामांसाठी कमी दरात लागणारी वाळू 12 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीला मिळू लागली. शेवटी दोन्ही खात्यांतील प्रमुख अधिकारी या कारवाईत सहभागी होत आज ही कारवाई केली. 

तहसीलदार स्वप्नील रावडे व पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या पथकाने केलेल्या कारवाई दरम्यान चार होड्यांद्वारे नदीच्या काठावर तीन लाख 50 हजार रुपये किमतीचा अंदाजे 50 ब्रास वाळू साठा जप्त करून तहसील कार्यालय, मंगळवेढा येथील प्रांगणात जमा केला. 

या कारवाई दरम्यान तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान बुरसे, मंडळ अधिकारी उल्हास पोळके, आर. एस. बनसोडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, पोलिस नाईक संतोष चव्हाण, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत पवार, पोलिस नाईक सुहास देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण सावंत, पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा जाधव, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश नलावडे, तलाठी विजय एकतपुरे, एस. एस. लोखंडे, ए. डी. जिरापुरे, डी. एस. लोंढे, अजित मुलाणी आदी कर्मचारी सहभागी झाले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsildar went by boat and took action against sand mafia