सांगोला शहरासह तालुक्‍यात 15 ते 24 सप्टेंबरदरम्यान दहा दिवसांचा जनता कर्फ्यू 

दत्तात्रय खंडागळे 
Sunday, 13 September 2020

नागरिकांनी सहकार्य करावे 
सांगोला तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लोकप्रतिनिधी, व्यापारी व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचे ठरवले आहे. या बंदमुळे कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत होईल. नागरिकांनीही या बंदला सहकार्य करून विनाकारण घराबाहेर न पडता सर्व शासनाच्या नियमांचे पालन करावे. या रोगाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रत्येकाने स्वतःसह इतरांची काळजी घेतली पाहिजे 
- शहाजी पाटील, आमदार, सांगोला 

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगोला शहरासह संपूर्ण तालुक्‍यात मंगळवार 15 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर असा 10 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूदरम्यान मेडिकल, हॉस्पिटल्स, दूध अशा अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. 
सांगोला शहरासह तालुक्‍यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंतेचे वातावरण होते. तालुक्‍यात कोरोना रुग्णसंख्या 1076 झाली आहे. तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात जनता कर्फ्यूबाबत सर्वपक्षीय बैठक आमदार शहाजी पाटील यांनी बोलावली होती. त्या बैठकीत जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांनी विरोध झाल्याने कोणताच निर्णय झाला नव्हता. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास चार-पाच दिवसांनी निर्णय घेण्याचे ठरले होते. सांगोला शहर व तालुक्‍यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत असून शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येने एक हजाराचा आकडा पार केला. 
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शनिवारी (ता. 12) रोजी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील व व्यापारी प्रतिनिधी यांची बैठक झाली. लोकप्रतिनिधी, व्यापारी यांच्यासह विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांबरोबर बंदबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर सांगोला शहर व तालुक्‍यात 15 ते 24 सप्टेंबरदरम्यान बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. व्यापारी संघटनेने 15 ते 24 सप्टेंबर दरम्यान हॉस्पिटल, मेडिकल, दूध अशा अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण सांगोला तालुका पूर्ण बंद राहणार आहे. 
आमदार शहाजी पाटील म्हणाले, सांगोला तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लोकप्रतिनिधी, व्यापारी व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचे ठरवले आहे. या बंदमुळे कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत होईल. नागरिकांनीही या बंदला सहकार्य करून विनाकारण घराबाहेर न पडता सर्व शासनाच्या नियमांचे पालन करावे. या रोगाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रत्येकाने स्वतःसह इतरांची काळजी घेतली पाहिजे 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten day public curfew in Sangola taluka from September 15 to 24