पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्याच्या उसाची चोरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

आनंदा गोविंद घालमे यांची गावातील हनुमान मंदिर लगत दोन एकर उसाची शेती आहे. ही जमीन त्यांनी पुनर्वसित विष्णू मारुती शिंदे (रा. आसगाव, ता. सातारा) यांच्याकडून 2018 मध्ये रीतसर खरेदी करून घेतली आहे. त्यानंतर या जमीन खरेदीची चतुःसीमा चुकीची आहे, असा तक्रारी अर्ज गावातील काही लोकांनी दिला आहे.

पंढरपूर (सोलापूर) : खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी आनंदा गोविंद घालमे यांच्या शेतातील कारखान्यासाठी तोडलेला 30 हजारांचा सुमारे 15 टन ऊस गावातीलच काही लोकांनी ट्रॅक्‍टरमध्ये भरून चोरून नेला आहे. ही चोरीची घटना बुधवारी (ता. 19) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. ऊसचोरी प्रकरणी खेडभाळवणी येथील सात संशयित आरोपींविरोधात तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 
फिर्यादी आनंदा गोविंद घालमे यांची गावातील हनुमान मंदिर लगत दोन एकर उसाची शेती आहे. ही जमीन त्यांनी पुनर्वसित विष्णू मारुती शिंदे (रा. आसगाव, ता. सातारा) यांच्याकडून 2018 मध्ये रीतसर खरेदी करून घेतली आहे. त्यानंतर या जमीन खरेदीची चतुःसीमा चुकीची आहे, असा तक्रारी अर्ज गावातील काही लोकांनी दिला आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, फिर्यादीच्या नावे असलेल्या या जमिनीतील उसाची तोडणी कारखान्याकडे सुरू असताना माजी सरपंच बिभीषण दादाराव पवार व इतर लोकांनी उसाच्या फडात येऊन जमिनीचा निकाल आमच्या सारखा लागला आहे. तुम्ही ऊस घेऊन जाऊ नका असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केली. या लोकांविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास आलो असतो, संशयित आरोपी दीपक विठ्ठल पवार, अजिनाथ भीमराव पवार, भारत सोपान पवार, समाधान मारुती पवार, सतीश विठ्ठल पवार, आनंता तुकाराम पवार, नवनाथ भालचंद्र पवार (रा. खेडभळवणी) यांनी माझे परस्पर 30 हजार रुपये किमतीचा 15 टन ऊस दीपक विठ्ठल पवार व अजिनाथ भीमराव पवार यांच्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीत भरून चोरून नेला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भस्मे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of farmers sugarcane in Pandharpur taluka