सांगोला तालुक्‍यातील पशुवैद्यकीय विभागात 21 पदे रिक्त ! साथीच्या रोगाने पशूंचे आरोग्यच धोक्‍यात 

दत्तात्रय खंडागळे
Thursday, 24 September 2020

सांगोला तालुक्‍यात पशुवैद्यकीय विभागात 65 पदे मंजूर असून, 44 पदे भरली आहेत तर 21 पदे रिक्त आहेत. तालुक्‍यात लाखोच्या संख्येने असलेल्या पशूंचे आरोग्य केवळ 44 पशुधन पर्यवेक्षकांच्या भरवशावर आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे साथीच्या रोगाने थैमान घातल्याने पशूंचे आरोग्य धोक्‍यात आले असल्याची ओरड पशुपालक व शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान अजनाळे (ता. सांगोला) येथील रोगाने तीस ते चाळीस शेळ्या दगावल्याने पशुपालकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात पशुवैद्यकीय विभागात 65 पदे मंजूर असून, 44 पदे भरली आहेत तर 21 पदे रिक्त आहेत. तालुक्‍यात लाखोच्या संख्येने असलेल्या पशूंचे आरोग्य केवळ 44 पशुधन पर्यवेक्षकांच्या भरवशावर आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे साथीच्या रोगाने थैमान घातल्याने पशूंचे आरोग्य धोक्‍यात आले असल्याची ओरड पशुपालक व शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान अजनाळे (ता. सांगोला) येथील रोगाने तीस ते चाळीस शेळ्या दगावल्याने पशुपालकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सध्या तालुक्‍यात पशूंच्या जीवघेण्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत मोठी यंत्रणा कामी लावण्याची आवश्‍यकता असताना आहेत त्या अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जात नाहीत. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे आपल्याच तालुक्‍याकडे दुर्लक्ष होत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे. पंचायत समितीअंतर्गत पशुसंवर्धन विभागात श्रेणी एकचे 15 व श्रेणी दोनचे 9 दवाखाने आहेत. 

अलीकडच्या काळात पशूंच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करण्याचे आवाहन केले जाते. अशा वेळी मार्गदर्शन करण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची आवश्‍यकता असते. तरीसुद्धा तालुक्‍यात पशू दवाखान्यांमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे आजारी असलेल्या पशूंना दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्याची वेळ येत आहे. सध्या तालुक्‍यात साथ रोगासारख्या आजाराने थैमान घातले आहे. अशा स्थितीत प्रत्येक गावात पशूंवर उपचार होऊन आजाराची लागण होऊ नये याकरिता जनजागृतीची आवश्‍यकता आहे. परंतु पशुवैद्यकीय विभागात यंत्रणा तोकडी असल्याने यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. याउलट आहेत त्या अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जात नाहीत. अतिवृष्टीमुळे साथ रोगाची स्थिती पाहता तत्काळ सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी पशुपालकांमधून केली जात आहे. 

पशुवैद्यकीय विभागातील पशुधन विकास अधिकाऱ्यांची 16 पदे मंजूर असून 13 भरली आहेत तर तीन रिक्त आहेत. सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असून सर्व पदे रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षकाची 14 पदे मंजूर असून 13 पदे भरली आहेत एक पद रिक्त आहे. व्रणोपचाराची चार पदे मंजूर असून एकच पद भरल्याने तीन पदे रिक्त आहेत. परिचरची 28 पदे मंजूर असून 17 पदे भरली आहेत तर 11 पदे रिक्त आहेत. पशुवैद्यकीय विभागात 65 पदे मंजूर असून 44 पदे भरली आहेत. तर 21 पदे रिक्त असल्याने पशूंचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

दरम्यान, मंगळवारी अजनाळे (ता. सांगोला) येथे साथीच्या रोगाने अनेक शेळ्या दगावल्याने पशुपालकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अस्लम सय्यद यांनी घटनास्थळी भेट देऊन मरण पावलेल्या शेळ्यांचा पंचनामा केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are 21 vacancies in the veterinary department in Sangola taluka