शिक्षण संस्थाचालकाकडून दोन लाखांची लाच घेणाऱ्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

पहिला हप्ता म्हणून बाळासाहेब गायकवाड व उमेश मस्के यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या गेटजवळ दोन लाख रुपये स्वीकारले. यात तक्रारदाराकडे एसीबीने एक लाखांची रोकड आणि बाकीचे कोरे कागद ठेवले होते. दोघांना अटक करण्यात आली आहे.

सोलापूर : शिक्षण संस्थेला खुलासा सादर करण्याच्या नोटीसवरून कारवाई न करता शिक्षण खात्यातून फाईल क्‍लिअर करून देण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून दोन लाख रूपये स्वीकारणाऱ्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे मंगळवारी रात्री रंगेहात पकडले. 

सुनील उर्फ बाळासाहेब काशीनाथ गायकवाड (वय 33, रा. शिवगंगानगर, कुमठा नाका, सोलापूर), उमेश भारत मस्के (वय 33, रा. अंबिकानगर, कुमठा नाका, सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरूध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यातील तक्रारदारांची शिक्षण संस्था आहे. शिक्षण संस्थेमध्ये आर.टी.ई. कायद्यान्वये वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. त्यांना प्राप्त झालेल्या निधीबाबत शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांनी खुलासा विचारला होता. त्या नोटीसवरून तक्रारदारांनी खुलासा सादर केला होता. शिक्षण विभागाने फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत कळवले होते. त्याबाबत बाळासाहेब गायकवाडने शिक्षण विभागात असलेल्या ओळखीचा वापर करून तक्रारदारावर फौजदारी गुन्हा दाखल न करता फाईल क्‍लिअर करून देण्यासाठी पाच लाखांची मागणी केली. याबाबत लेखी तक्रार आली होती. एसीबीच्या पथकाने तक्रारीची खात्री करून मंगळवारी सापळा लावला.

पहिला हप्ता म्हणून बाळासाहेब गायकवाड व उमेश मस्के यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या गेटजवळ दोन लाख रुपये स्वीकारले. यात तक्रारदाराकडे एसीबीने एक लाखांची रोकड आणि बाकीचे कोरे कागद ठेवले होते. दोघांना अटक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two bribe takers arrested