जपानहून पंढरपुरात आलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात 

भारत नागणे 
सोमवार, 22 जून 2020

पंढरपूर तालुका कोरोनामुक्त 
पंढरपूर तालुक्‍यात पहिला कोरोनाचा रुग्ण उपरी येथे मेच्या दुसऱ्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर पंढरपूर शहर, गोपाळपूर, करकंब, बार्डी आदी ठिकाणी आठ रुग्ण आढळले होते. तालुक्‍यात कोरोनाची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात असताना प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या यशस्वी प्रयत्नांना आज यश आले आहे. यापुढच्या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी केले आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : जपानहून पंढरपुरात आलेल्या कोरोनाबाधित दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज सकाळी त्याला वाखरी येथील कोविड केअर सेंटरमधून घरी सोडले. यावेळी तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांनी गुलाब पुष्प देऊन त्याचे अभिनंदन केले. त्यानंतर पंढरपूर शहर व तालुका कोरोनामुक्त करण्यास प्रशासनाला यश आले आहे. 
अलीकडेच पंढरपुरातील एक दाम्पत्य 28 मे रोजी जपान येथून पंढरपुरात आले होते. त्यानंतर दोन वर्षांच्या लहान मुलासह दाम्पत्याला सोलापुरात क्वारंटाइन केले होते. दरम्यान, त्यांच्या दोन वर्षांच्या लहान मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाले होते. 
तातडीने त्यांच्यावर वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू केले. आज 18 दिवसांच्या उपचारानंतर त्याने कोरोनावर मात केली. 
चिमकुल्याने कोरोनावर मात केल्यानंतर आज प्रशासनाच्या वतीने त्याचे स्वागत केले. उपस्थित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फुलांची उधळण करत त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, वैद्यकीय अधिकारी जयश्री ढवळे, डॉ. केचे, डॉ. पाटील आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two year old Child who came to Pandharpur from Japan overcame Corona