Sagar Misal
Sagar Misal

अवघ्या चोविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये यश ! सागर मिसाळने मिळवली देशात 204 वी रॅंक 

श्रीपूर (सोलापूर) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, वाघोली (ता. माळशिरस) येथील शेतकरी कुटुंबातील सागर भारत मिसाळ याने या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सागर याने पहिल्याच प्रयत्नात अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून वयाच्या 24 व्या वर्षी हे यश संपादन केले असून, सागरला 204 वी रॅंक मिळाली आहे. 

सागरचे प्राथमिक शिक्षण वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण विजयसिंह मोहिते महाविद्यालय, वाघोली येथे तर उच्च शिक्षण अकलूज येथे झाले. त्यानंतर पुणे येथे शासकीय महाविद्यालयातून त्याने बीएस्सी ऍग्रीची पदवी संपादित केली आहे. सागरच्या या यशाच्या निमित्ताने वाघोली ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे. गावातील युवकांनी फटाक्‍यांची आतषबाजी करून सागरच्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला आहे. दिल्ली येथे व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी जाऊन आलेल्या सागरने अकलूज येथे स्वतःला क्वारंटाइन करून घेतले होते. या यशाची वार्ता समजल्यानंतर तो वाघोली येथे दाखल झाला. त्या वेळी त्याच्या आई व वडिलांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. 

इयत्ता चौथी व इयत्ता सातवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान सागरने मिळविला होता. बीएस्सी ऍग्री ही पदवी शासकीय महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर त्याची यूपीएससीसाठी विशेष शिष्यवृत्तीमधून निवड झाली होती. सागरचे वडील एक सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी तर आई गृहिणी आहे. 

या यशाबद्दल सागर म्हणाला, अधिकारी होण्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, परिश्रम करावे लागतात. मला माझ्या घरच्यांबरोबर गुरुजनांचीही मोठी साथ लाभली. याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा मला लाभ मिळाला असून शासन नेहमीच विद्यार्थ्यांसाठी सहकार्याच्या भूमिकेत असते. ग्रामीण भागातील मुलांनी आपल्यामध्ये कधीच उणीव न बाळगता जिद्द, परिश्रम आणि कठोर मेहनत घेतल्यास यश मिळते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com