शिरापूर येथे जहाल विषारी "इंडियन कोब्रा' पकडला ! सर्पमित्रामुळे मिळाले जीवदान 

चंद्रकांत देवकते 
Saturday, 21 November 2020

तालुक्‍यातील शिरापूर (सो) येथे प्रभाकर शितोळे यांच्या वस्तीजवळ साडेपाच फूट लांबी असलेल्या अत्यंत जहाल विषारी इंडियन कोब्रा जातीच्या नागाला सर्पमित्र दत्तात्रय बुरांडे यांनी जिवंत पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. 

मोहोळ (सोलापूर) : तालुक्‍यातील शिरापूर (सो) येथे प्रभाकर शितोळे यांच्या वस्तीजवळ साडेपाच फूट लांबी असलेल्या अत्यंत जहाल विषारी इंडियन कोब्रा जातीच्या नागाला सर्पमित्र दत्तात्रय बुरांडे यांनी जिवंत पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. 

याबाबत अधिक माहिती अशी, की शनिवारी (ता. 21) दुपारी साधारणतः साडेबाराच्या सुमारास शिरापूर येथे शेतातच असलेल्या घरासमोरील अंगणात लहान मुले खेळत असताना प्रभाकर शितोळे यांचे लहान बंधू बंडू शितोळे यांनी घरासमोर असलेल्या तारेच्या कंपाउंडजवळून साप जाताना पाहिला. त्यांनी साप जिथे जातो त्या ठिकाणी नजर ठेवली व तत्काळ भाऊ प्रभाकर यांना फोन केला. प्रभाकर यांनी "सकाळ'चे शहर प्रतिनिधी चंद्रकांत देवकते यांना त्वरित फोनवरून संबंधित घटना सांगत सर्पमित्राचा नंबर मागितला. परंतु देवकते हे प्रत्यक्षात सर्पमित्र दत्तात्रय बुरांडे यांच्याशी स्वतः संपर्क साधून सर्पमित्राला घेऊन अवघ्या वीस मिनिटांत शिरापूर येथे पोचले. 

सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अत्यंत झाडाझुडपांत व अडगळीची जागी बसलेल्या इंडियन कोब्रा नागाला अखेर सुरक्षित पकडण्यात आले व त्याला एका बरणीमध्ये सीलबंद करून मोहोळच्या तांबोळे रस्त्यावरील फॉरेस्टच्या रानात निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. या अत्यत जहाल विषारी जातीच्या नागाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. याप्रसंगी सोमनाथ शितोळे, संतोष आडाणे, सोमनाथ मसलकर, नीलेश मसलकर, प्रशांत कुंभार, महेश गायकवाड यांनी अडगळ दूर करण्यास मदत केली. 

भारतातील अत्यंत विषारी जातीच्या मोजक्‍याच जातींपैकी इंडियन कोब्रा हा नाग असून आजपर्यंत साप पकडताना तीनवेळा मला सर्पदंश झाला आहे. त्यामुळे आई यमुना बुरांडे हिचा आता या कामास विरोध होतो. परंतु आपल्यामुळे एका प्राण्याचा जीव वाचतो आहे. त्यामुळे मला समजले की मुक्‍या सापांना जीवदान देईपर्यंत चैन पडत नाही व जाऊन साप पकडतो आणि त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडतो. 
- दत्तात्रय बुरांडे, सर्पमित्र 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A venomous Indian cobra snake was found at Shirapur