गायगव्हाण गावात कोरोनाचीच ऐशी-तैशी ! ग्राम कृती समिती निष्प्रभ

उमेश महाजन 
Monday, 31 August 2020

गायगव्हाण गावात 22 ऑगस्ट रोजी एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या. या तिघांना कमलापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये अथवा सांगोल्यातील दक्षता हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला. मात्र आपणास कोणताच त्रास होत नसल्याने आम्ही घरीच राहणार, असा त्यांनी हेका धरला. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री त्यांच्या वस्तीवरील घरी जाऊन त्यांना सांगोला येथे दाखल होण्याची विनंती केली. तेव्हा दुसऱ्या दिवशी दुपारी हे तिघेजण सांगोल्यातील दक्षता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. 

महूद (सोलापूर) : लॉकडाउन संपून अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दिवसागणिक रुग्णांची व मृत्यूची संख्या वाढते आहे. नेमक्‍या अशावेळी कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या ग्राम कृती समिती निष्प्रभ ठरू लागल्या आहेत. सांगोला तालुक्‍यातील गायगव्हाण येथील रुग्णांना स्वतःची काळजी नाही तर ग्राम कृती समिती म्हणजे निव्वळ शासकीय बुजगावणे ठरले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांनी व शासकीय यंत्रणेने कोरोनाचीच ऐशीतैशी केली आहे. 

हेही वाचा : "वंचित'चे आंदोलन : पंढरपुरात 400 पोलिसांचा तगडा बंदोबस्त; सात प्रमुख रस्त्यांवर तिहेरी नाकाबंदी 

सांगोला तालुक्‍यातील गायगव्हाण हे सुमारे दीड ते दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. महूदपासून जवळच असलेल्या या छोट्याशा गावाला नीरा उजवा कालव्याचे पाणी मिळत असल्याने डाळिंब व भाजीपाला या पिकांनी बरकत आलेली आहे. सुधारित पंढरपूर-मल्हारपेठ राज्यमार्ग जवळून गेल्याने ढाबे व हॉटेल यांची विपुलता आहे. बाहेर गावावरून मोलमजुरीसाठी आलेल्या श्रमिकांची संख्याही येथे मोठी आहे. या गावात 22 ऑगस्ट रोजी कोरोनाचे पुन्हा आगमन झाले. एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या. या तिघांना कमलापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये अथवा सांगोल्यातील दक्षता हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला. मात्र आपणास कोणताच त्रास होत नसल्याने आम्ही घरीच राहणार, असा त्यांनी हेका धरला.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री त्यांच्या वस्तीवरील घरी जाऊन त्यांना सांगोला येथे दाखल होण्याची विनंती केली. तेव्हा दुसऱ्या दिवशी दुपारी हे तिघेजण सांगोल्यातील दक्षता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. येथे केवळ एक-दोन दिवस उपचार घेतल्यानंतर आम्ही सोलापूर येथे खासगी रुग्णालयात जातो आहे, असे सांगून तेथून बाहेर पडले व थेट घरी येऊन राहिले. दरम्यान, घरातील तपासणी झालेले इतर सहाजण 25 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. पहिले तिघे व नंतरचे सहा असे एकूण नऊजण घरीच राहू लागले. 

हेही वाचा : कोरोना काळात आंदोलन करणे अयोग्य? "वंचित'च्या आंदोलनाला वारकरी संघटनांचा विरोध 

निव्वळ औपचारिकता पार पाडणारे प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करण्यास धजावत नाही. ग्रामकृती समितीचे काही सदस्य त्यांच्या घरी गेले असता त्यांनी घरातच विलगीकरणासाठी ग्रामपंचायतीने व एका खासगी डॉक्‍टरांनी परवानगी दिली असल्याचे पत्र दाखवले. आणि इतरत्र दाखल होण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान, 27 ऑगस्ट रोजी या कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. कुटुंबाने घराच्या परिसरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. 28 ऑगस्ट रोजी या कुटुंबातील उर्वरित आठ जणांनी स्वतः पंढरपूर येथे जाऊन खासगी लॅबमध्ये तपासणी केली. त्यामध्ये आठपैकी चार पॉझिटिव्ह तर चार निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्ती तीन ते सात दिवसांत निगेटिव्ह कशा झाल्या, हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. 

28 ऑगस्ट रोजी गायगव्हाण येथील ग्रामकृती समितीने बैठक घेण्याचा सोपस्कार पार पाडला. कोरोनाबाधित कुटुंबाला रुग्णालयात दाखल होण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे, असे या बैठकीत सांगण्यात आले. शिवाय हे लोक केअर सेंटरमध्ये दाखल होत नसतील तर पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात यावा, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. गावात यापुढे कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्यास त्याला होम क्वारंटाइन न करता केअर सेंटरला पाठवण्यात यावे, असा ठरावही केला आहे. मात्र हा ठराव केवळ कागदावरच असून त्याची प्रत्यक्षात कोठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तींचे उद्‌बोधन करण्यास ग्रामकृती समिती अपयशी ठरल्याने ते मुक्त संचार करत आहेत. 

गायगव्हाण येथील कोरोनाबाधित व्यक्ती कोणाचाही सल्ला मानण्यास तयार नाहीत. केअर सेंटरमध्ये, रुग्णालयात किंवा घरात कोठेच हे विलगीकरणात राहण्यास तयार नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. क्वारंटाइन होण्यास विरोध करून ही मंडळी कोरोना संसर्ग वाढीस कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आहे. कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या अज्ञानी लोकांवर कारवाई करण्याबाबत ग्रामकृती समितीमध्ये अनास्था आहे. स्थानिक पातळीवर सर्वच विभागांची भूमिका चमडी बचावाची आहे. आतापर्यंत भयंकर असणाऱ्या कोरोनाबाबत प्रशासन व सर्वपक्षीय तडजोड येथे केली असल्याची चर्चा आहे. अशा प्रकारच्या भूमिकेमुळे काही अघटित घडल्यास याला जबाबदार कोण? अशी भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. आशा सेविका, आरोग्य सेवक व पोलिस यांना क्वारंटाइनबाबत सर्वाधिकार देण्यात यावेत. हलगर्जीपणा झाल्यास त्यांना जबाबदार धरण्यात यावे. रुग्ण चुकीचं वर्तन करत असतील तर तत्काळ पोलिसांना कळवून योग्य ती कारवाई करण्यात यावी. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या क्वारंटाइनबाबत कुणीही मवाळ धोरण स्वीकारू नये व गायगव्हाण येथील या प्रकाराबाबत वरिष्ठ प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन ग्रामस्थांना आश्वासित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The village action committee of Gaigavhan village is failing regarding Corona