भरकटलेल्या सोशल मीडियामुळे "येथील' ग्राम कृती समितीला कोरोनाची नव्हे तर नागरिकांचीच दहशत ! 

coronavirus
coronavirus

महूद (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील महूद येथे तालुक्‍यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मात्र कोरोनाबाबत अज्ञान असलेल्या नागरिकांकडून ग्राम कृती समितीला दमदाटी होत असल्याने येथील कृती समितीला कोरोनाची दहशत अशीही व तशीही सहन करत काम करावे लागत आहे. त्यामुळे येथील ग्राम कृती समितीला पोलिस संरक्षण हवे आहे. 

22 जुलै रोजी महूद येथे पहिला कोरोना रुग्ण सापडला. आजअखेर येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27 झाली आहे. गावातील वेगवेगळ्या भागांत हे रुग्ण मिळाल्याने संपूर्ण गावठाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावात कडक लॉकडाउन चालू असतानाही रुग्णसंख्या वाढत आहे. गावातील मेडिकल व दवाखाने वगळता बॅंकांसह सर्व व्यवहार बंद आहेत. कोरोना महामारीवर उपाययोजना करण्याकरिता येथे नेमण्यात आलेल्या ग्रामस्तरीय कृती समितीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत येथील ग्राम कृती समितीने तालुकास्तरीय कृती समितीला अर्ज करून येथील समस्या मांडल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना कमलापूर येथील कोव्हिड केअर सेंटरला पाठवताना त्यांचे नातेवाईक, शेजारील ग्रामस्थ कृती समितीमधील सदस्यांना दमदाटी व शिवीगाळ करतात. शिवाय अर्वाच्य भाषा वापरून अपमानित करतात आणि रुग्ण पाठविण्याच्या प्रक्रियेत अडथळेही आणतात. 

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या जवळच्या व दूरच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणी करण्यासाठी बोलावले असता ते येत नाहीत. शिवाय तपासणी केल्यानंतर शाळेत विलगीकरणासाठी ठेवले असताना विलगीकरण केंद्राच्या ठिकाणी थांबत नाहीत. थांबवले तर शाळेच्या भिंतीवरून उड्या मारून परस्पर गावात घरी निघून जात आहेत. लोकांच्या अशा वागण्यामुळे गावात कोरोनाचा प्रसार अधिक होत आहे. या सर्व अडचणींना तोंड देत असताना प्रत्येक वेळेस पोलिस स्टेशनला संपर्क साधून मदत घ्यावी लागत आहे. त्यासाठी कोव्हिड-19 याकामी दोन स्वतंत्र पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, ज्यामुळे पोलिस कृती समितीसोबत राहतील आणि होणारा गोंधळ थांबेल. शिवाय संशयित रुग्ण अथवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शाळेत विलगीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी इतर विभागातील दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. त्यामुळे परस्पर घरी निघून जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवणे सोपे होईल. 

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या खूपच अपुरी असल्याने रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे अथवा त्यांची तपासणी करणे यासाठी खूप अडचणी येत आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसे आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या अडचणीमुळे येथे कोरोनाचा फैलाव होत आहे. रुग्णाच्या संपर्कातील लोकांची संख्या पाहून येथील प्राथमिक शाळेसह शिवाजी विद्यालयाची इमारतही ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र लोकच या ठिकाणी थांबत नाहीत. 23 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या येथील लॉकडाउनची मुदत 5 ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यामुळे त्याबाबत पुढे काय निर्णय होतो याची वाट येथील ग्रामस्थ पाहात आहेत. 

भरकटलेल्या सोशल मीडियाचे आव्हान 
भरकटलेला सोशल मीडिया महूद ग्रामकृती समितीसाठी आव्हान ठरतो आहे. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पोस्टच्या आधारे नागरिक ग्राम कृती समितीवर प्रश्नांची सरबत्ती करतात. 

याबाबत मंडलाधिकारी दिनेश भडंगे म्हणाले, वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार येथील डॉक्‍टर, मेडिकल चालक, किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, कृषी व्यावसायिक, कृती समितीमधील कर्मचारी आदींच्या रॅपिड अँटिजेन तपासण्या करण्यात आल्या आहेत. आवश्‍यक तेथे मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्याची प्रशासनाची तयारी आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com