रिटेवाडी ग्रामस्थ बसणार उपोषणाला ! 40 वर्षांनंतरही होत नाही मंजूर रस्त्याचे काम; मुख्यमंत्र्यांना पत्र 

Ritewadi
Ritewadi

करमाळा (सोलापूर) : 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही मंजूर झालेला रस्ता होत नसल्याने रिटेवाडी (ता. करमाळा) या उजनी पुनर्वसित गावातील ग्रामस्थांनी 1 ऑक्‍टोबरपासून बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत शासनाने लक्ष घालावे म्हणून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच ग्रामस्थांनी पत्र पाठवले आहे. 

गावाला जायला रस्ताच नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. उजनी धरणाच्या निर्मितीच्या वेळी रिटेवाडी हे गाव पुनर्वसित झाले. गावाच्या तिन्ही बाजूने उजनीचे पाणी आहे. त्यामुळे एकाच बाजूने गावाला जाण्यासाठी रस्ता होऊ शकतो. गावाला रस्ता मिळावा म्हणून अनेक प्रयत्न झाले. अनेक वेळा मंत्रालयापर्यंत ग्रामस्थ जाऊन आले. शेवटी 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेतला. 

गावाचे पुनर्वसन झाल्यापासून 2019 पर्यंत या गावाला रस्ताच नव्हता. 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही गावाला रस्ता मिळत नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेताच प्रशासन खडबडून जागे झाले. या वेळी उजनी पुनर्वसित विभागाच्या वतीने पाठपुरावा करून या गावासाठी तत्काळ रस्त्याला मंजुरी देण्यात आली. 15 एप्रिल 2019 रोजी या कामासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली. या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी 46 लाख 64 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला. ठेकेदार मे. पद्मावती कन्स्ट्रक्‍शन कंपनी, इंदापूर, जि. पुणे यांनी हे काम घेतले. 

या कामाला 18 सप्टेंबर 2019 रोजी प्रत्यक्षात सुरवात झाली. मात्र 2019 विधानसभेची निवडणूक होताच हे काम बंद पडले. ऑक्‍टोबर 2019 पासून ग्रामस्थांनी मंजूर रस्त्याचे बंद पडलेले काम व्हावे म्हणून अनेक वेळा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, संबंधित ठेकेदार यांच्याकडे पाठपुरावा केला; मात्र एवढे प्रयत्न करूनही संबंधित ठेकेदार काम करत नसल्याने अखेर या ग्रामस्थांनी 1 ऑक्‍टोबरपासून करमाळा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना दिले आहे. 

या वेळी रिटेवाडीचे सरपंच दादासाहेब कोकरे, उपसरपंच भिवा कोकरे, सदस्य शिवराम ढवळे, मगनदास कोकरे, अमोल कोकरे, संभाजी रिटे, नीलेश कोकरे, मामासाहेब खटके, अंगद गोडगे, भाऊ कोकरे, नवा रिटे, धुळा कोकरे, विश्वनाथ रिटे, गोरख रिटे, उमेश रिटे, कल्याण कोकरे, शुभम कोकरे आदी उपस्थित होते. 

याबाबत रिटेवाडीचे सरपंच दादासाहेब कोकरे म्हणाले, खूप प्रयत्नांनंतर रिटेवाडी गावाला रस्ता मिळाला. निधी मंजूर झाला, काम सुरू झाले. नंतर काम बंद पडले. संबंधित ठेकेदाराला वारंवार विनंती करूनही ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. राजकीय पदाधिकाऱ्यांच्याही हे प्रकरण कानावर घातले, तरीही काम सुरू होत नसल्याने आम्ही सर्व ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. 

सहाय्यक अभियंता रमेश राठोड म्हणाले, खास बाब म्हणून रिटेवाडीसाठी हा रस्ता मंजूर केला आहे. रिटेवाडीला जाणारा रस्ता रिटेवाडी व मांजरगाव हद्दीतून जातो. त्यात रिटेवाडीचे भूसंपादन झाले आहे. मात्र मांजरगाव हद्दीतील 0.88 आर जमीन संपादित करायची आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. महिनाभरात हे काम सुरू होईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com