esakal | "या' मंदिर समितीला मिळाले मागील वर्षी साडेचार कोटी तर यावर्षी केवळ 16 लाखांचे उत्पन्न 
sakal

बोलून बातमी शोधा

Vitthal-Rukmini Temple

आषाढी यात्रेला मागील वर्षी श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून तब्बल चार कोटी 40 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र कोरोनामुळे आषाढी यात्रा भरू न शकल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला केवळ 16 लाख 15 हजार 860 रुपये उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली.

"या' मंदिर समितीला मिळाले मागील वर्षी साडेचार कोटी तर यावर्षी केवळ 16 लाखांचे उत्पन्न 

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेला मागील वर्षी श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून तब्बल चार कोटी 40 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र 
कोरोनामुळे आषाढी यात्रा भरू न शकल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला केवळ 16 लाख 15 हजार 860 रुपये उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर 15 जुलैपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणार अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा साधेपणाने 

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रा काळात आठ दिवस लाखोंच्या संख्येने भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. आलेले भाविक मंदिरातील देणगी पेटीमध्ये काही ना काही रक्कम टाकतात तर काही भाविक देणगी पावती करतात. वारकरी भाविकांच्या माध्यमातून श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या चरणाजवळ देखील मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होत असते. 2018 मध्ये श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला आषाढी यात्रा काळात दोन कोटी 90 लाख 44 हजार 641 एवढे उत्पन्न मिळाले होते. मागील वर्षी 2019 मधील आषाढी यात्राकाळात त्यामध्ये एक कोटी 44 लाख 93 हजार 145 रुपयांची वाढ होऊन श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला तब्बल चार कोटी 40 लाख 37 हजार 786 इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र आषाढी यात्रा भरू शकली नाही. कोरोनामुळे भाविकांना पंढरपूरला येण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट झाली. 

हेही वाचा : अगोदर ऍक्‍शन प्लॅन मग सोलापूरचा लॉकडाउन 

आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला दरवर्षी आयआरबी कंपनीकडून देणगी दिली जाते. यंदा या कंपनीकडून 11 लाख रुपये देणगी धनादेश जमा करण्यात आला. याशिवाय अन्य काही भाविकांनी देणगी जमा केली. याशिवाय अन्नछत्र कायमस्वरूपी ठेव योजनेसाठी ऑनलाइनद्वारे 66 हजार रुपये जमा झाले. महानैवेद्य योजनेसाठी ऑनलाइन 30 हजार रुपये जमा झाले तर तीन लाख 42 हजार 712 रुपये ऑनलाइन देणगी जमा झाली. एकूण 16 लाख 15 हजार 860 रुपये उत्पन्न मंदिर समितीला मिळाले. 

15 जुलैपर्यंत राहणार मंदिर बंद 
9 जुलै रोजी श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात प्रक्षाळ पूजा करण्यात येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर 15 जुलैपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.