वक्त के साथ, किस्मत के हाथ, जाना है हमे रुको तो... ; ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा यांनी टिपल्या वेदना 

surekha shaha.jpg
surekha shaha.jpg

सोलापूरः सांसो की महेफीलसे उड चली है जान....वक्त के साथ, किस्मत के हाथ, जाना है हमे रुको तो... असे म्हणत वेदनांच्या ग्लानीत सापडलेला गुलशन, भिवंडीतून गावाकडे निघालेली आठ महिन्याची गर्भवती पारू...आणि देव हरवलेला पुजारी...या गोष्टींनी माझे मन काळाचे प्रतिबिंब कागदावर मांडताना हरवून गेले. ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा या कोरोनाकाळातील त्यांच्या लेखनाचे संदर्भ सांगत होत्या. लेखिका सुरेखा शहा यांनी कोरोनाच्या काळातील घटनांवर आधारित 22 कथा लिहिल्या आहेत. 

मला चटका लावणारी तरुण गायक गुलशन यांची कहानी अधिक भावली. हा तरुण गायक अचानक कोरोनाच्या संसर्गात सापडतो. वेदनांच्या ग्लानीत तो सापडतो. त्याचे चाहते रुग्णालयाबाहेरून अस्वस्थपणे त्याची वेदनांची लढाई अनुभवतात. गुलशन मात्र वेदनेच्या ग्लानीत "यह घडी न हरगिज टाली जायेगी, जब तेरी डोली उठाई जायेगी' अशा ओळी गुणगुणत मृत्यूशी लढत असतो. भिवंडीतून शंकर त्याची आठ महिन्याची गर्भवती पत्नी पारूला घेऊन पायी निघतो. रस्त्यात तिच्या प्रसृतीच्या वेळी गावातील महिलांना बोलावणाऱ्या शंकरच्या हाका व तळमळ फाटलेले आकाश आणि खचलेली जमीन या कथेत मांडली. नेहमी विदेशात असलेल्या मुलांच्या यशाच्या गोष्टी सांगणाऱ्या आईबाबांचे अमेरिकेतील कोरोनाच्या कहरात सापडलेल्या मुलाच्या जगण्याची देवाकडे याचना करत आहेत. 

या स्थितीत तेवढेच सजग असलेल्या काही लोकांचे हात अन्नदानासाठी लोकांची भूक भागवण्यासाठी शहरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरत होते. अन्नदाता सुखी भव या कथेत या अन्नदात्याची कहानी मी मांडली. कोरोनाच्या कहरात, त्या गोजिरवाण्या घरात या कथेत मी प्रत्येक कुटुंबाची परिस्थितीसोबत चाललेली तडजोड मांडली. अनेक घरात मुलांनी लॉकडाउनमध्ये अनेक कला शिकत स्वतःचे निर्मितीचे भाव विश्‍व तयार केल्याचे चित्रण कथेत मांडले. गावात देवाची पुजा करण्यासाठी आलेल्या पुजाऱ्याला गावातील लोक देव सोडून गावाबाहेर जीव वाचवण्यासाठी पाठवतात. तेव्हा त्याच्या मनातील देवाच्या बद्दलची भावना वेगळ्या मनोभूमिकेतून मला मांडता आली. घरात बंद झालेल्या सासू व सुनेतील संवादाचे नवे अंतरंग तेवढेच प्रभावीपणे एक कथेत लिहिले. 
या स्थितीत मला कुठेही लेखनात थांबावेसे वाटले नाही. जवळपास मी एक दिवसाआड एक या प्रमाणे कथा लिहित गेले. कदाचित आमच्या पिढीने पाहिलेली ही पहिलीच महामारी अनुभवली. वेदना व मृत्युच्या तांडवात देखील झाडाप्रमाणे उगवलेल्या आशा देखील माझ्या लेखनात उमटल्या. मागील अनेक वर्षापासून लेखन करताना हा लेखनाचा अनुभव माझ्या अंर्तमनाशी खूप अधिक जोडलेला होता असे मला वाटते. या काळात तब्बल बावीस कथा, कथुकल्या, गझल व काही कविता लिहिल्याचे त्या सांगत होत्या.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com