विठ्ठलाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर फवारण्याची केवळ समाजमाध्यमातील चर्चा : जळगावकर महाराज 

भारत नागणे 
Friday, 28 August 2020

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर म्हणाले, देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर फवारण्याची कुठेही अधिकृत चर्चा झाली नाही. केवळ समाज माध्यमातून चर्चा सुरू आहे. देवाच्या पायावर सॅनिटायझर मारण्याचा विषय आलाच तर वारकरी म्हणून आमचा विरोध राहील. 

पंढरपूर (सोलापूर) : देशातील काही प्रमुख मंदिरे उघडल्यानंतर आता पंढरपूरचेही श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. त्यातच देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर फवारण्याची चर्चा सुरू झाल्याने वारकरी संप्रदायामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा : सरकोली येथे दोन गटांत मारामारी; 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

यासंदर्भात श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी, देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर फवारण्याची कुठेही अधिकृत चर्चा झाली नाही. केवळ समाज माध्यमातून चर्चा सुरू आहे. देवाच्या पायावर सॅनिटायझर मारण्याचा विषय आलाच तर वारकरी म्हणून आमचा विरोध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाविकांना देवाचे मुखदर्शन सुरू करावे, अशी मागणीही जळगावकर महाराज यांनी केली आहे. 

हेही वाचा : अशीच स्थिती राहिल्यास "उजनी' भरण्यास लागतील एवढे दिवस 

राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिल्यानंतर विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल, मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकण्यास आमचा ठाम विरोध राहील, अशी भूमिका देखील त्यानी मांडली आहे. तसेच दर्शनाचा वाद आणि देवाच्या पायावर सॅनिटायझर न फवारता काही दिवस मुखदर्शन सुरू करावे, अशी मागणीही जळगावकर महाराज यांनी केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. राज्य आणि केंद्र सरकारने अनलॉक जाहीर केल्यानंतर दारू दुकानांसह बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता धार्मिक मंदिरे सुरू करण्यासाठी विविध संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यातच आता देवाच्या पायावर सॅनिटायझर फवारण्याचा वादग्रस्त विषय पुढे आला आहे. 

विश्व वारकरी सेना व वंचित बहुजन आघाडीने एक लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजपनेही या मुद्द्यावर राज्यभर घंटानाद आंदोलन पुकारले आहे, तर सर्वच पक्षांतील राजकीय नेते मंदिर उघडण्याबाबत आता आक्रमक होऊ लागले आहेत. 

याबाबत श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, विठ्ठल मंदिर सुरू करण्याबाबत मंदिर प्रशासन अजूनही साशंक असून, सध्या कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता मंदिर उघडणे शक्‍य नसल्याचा सूर आहे. सरकारने आदेश दिले तर मात्र देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार दर्शन व्यवस्था सुरू केली जाईल. सर्वसाधारणपणे इतर काळात रोज 15 ते 20 हजार भाविकांना पायावर दर्शन मिळते मात्र सध्याच्या करोना काळात सर्व नियम पाळून दर्शन द्यायचे झाल्यास कसेबसे एक हजार भाविकांना सोशल डिस्टन्स पाळून दर्शन व्यवस्था करता येईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warakari sect opposes spraying alcoholic sanitizer on Vitthals feet