अरे व्वा..! दुष्काळग्रस्त "या' गावाची वाटचाल सुकाळकडे; लोकवर्गणीतून खोदलेल्या दहा किमी ओढ्यात जमले हक्काचे पाणी 

Korti
Korti

केत्तूर (सोलापूर) : कायम दुष्काळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या करमाळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील कोर्टी गावाची हंगामी बागायती असणारी शेती सततच्या दुष्काळाने कायम कोरडवाहू झाली अन्‌ शेतीची पार शोभाच गेली. पण कोर्टी गावाची आता दुष्काळाकडून सुकाळाकडे वाटचाल होणार आहे. कोर्टीत पाणी फाउंडेशन अन्‌ लोकवर्गणीतून तब्बल दहा किलोमीटर लांबीचा ओढा खोलीकरण झाले. यावर्षी वेळीच पडलेल्या पावसाने दहा किलोमीटर अंतरावर असलेले बंधारे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे परिसरात असलेल्या विहिरींमधील भूजल पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आता मोठा भाग ओलिताखाली येणार आहे, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. 

कोर्टी गावातील 15 तरुणांनी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेऊन गावाला प्रशिक्षित केले. शिवाय करमाळाचे तत्कालीन तहसीलदार संजय पवार, तालुका समन्वयक अजिंक्‍य गुरव आणि कोर्टी परिसरातील ग्रामस्थांनी गावाला गतवैभव मिळवून देण्यासाठीच्या या कामात चांगलाच पुढाकार घेतला. या कामात ग्रामस्थांबरोबर वाडी-वस्तीवरील महिलांनी देखील उस्फूर्त सहभाग नोंदवला. गेल्या पाच वर्षांपूर्वी कोर्टीमध्ये लिंबू, पपई, बोर, डाळिंब यांच्या बागा लक्ष वेधून घेत होत्या. मात्र गेल्या चार वर्षांपासून सलग पडत असलेल्या दुष्काळाने हे चित्रच बदलून टाकले. परंतु दुष्काळात होरपळ झालेल्या शेतकऱ्यांना पाणी अडवण्याचे व जिरवण्याचे महत्त्व पटले. त्यामुळे कोर्टी गावातील गावकऱ्यांनी दुष्काळ हटवण्याची मोहीम हाती घेतली व ओढा खोलीकरण, दोन हजार सीसीटी, 78 शोषखड्डे, 365 दगडी बंधारे, गाव परिसरात असलेले सर्व नाले दुरुस्ती, तलावातील गाळ काढणे आदी कामे केली. आता परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, अशी माहिती कोर्टी येथील ग्रामस्थांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

तालुका समन्वयक अजिंक्‍य गुरव म्हणाले, गावाच्या परिवर्तनाची शक्ती युवकांमध्ये आहे, हे कोर्टी येथील युवकांनी दाखवून दिले. आपलं गाव दुष्काळमुक्त केलं. जलसंधारणाचे काम करत असताना 365 अवघड दगडी बांध एकाच दिवसात तयार करण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला. तब्बल दहा किलोमीटर ओढा खोलीकरण केले. अशी उल्लेखनीय कामे गावात झाली. गावाच्या भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा फायदा येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना होणार आहे. कोर्टी गावाने आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com