esakal | अरे बाप रे? आपल्याला काय व्हतंय म्हणणाऱ्या वाड्या, वस्त्याही भेदरल्या 
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown - Copy.jpg

सोलापूर : आपल्यात लई ऊन पडतयं, आपल्याला अमूक..अमूकचा आशीर्वाद आहे यासह अनेक समज, गैरसमजात असलेला ग्रामीण भाग आज कोरोनाला घाबरला आहे. चीन, स्पेन, इटलीनंतर मुंबई, पुण्यात आलेला कोरोना आपल्यापर्यंत कशाला येतोय? अशा भ्रमात असलेल्या वाड्य-वस्त्या आज भेदरल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील वांगी आणि येळेगाव माळावर असलेल्या पांगळे आणि खांडेकर यांच्या बेदाणा शेड येथे काम केलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाची दहशत आता वाडी आणि वस्तीत पोचली आहे.

अरे बाप रे? आपल्याला काय व्हतंय म्हणणाऱ्या वाड्या, वस्त्याही भेदरल्या 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : आपल्यात लई ऊन पडतयं, आपल्याला अमूक..अमूकचा आशीर्वाद आहे यासह अनेक समज, गैरसमजात असलेला ग्रामीण भाग आज कोरोनाला घाबरला आहे. चीन, स्पेन, इटलीनंतर मुंबई, पुण्यात आलेला कोरोना आपल्यापर्यंत कशाला येतोय? अशा भ्रमात असलेल्या वाड्य-वस्त्या आज भेदरल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील वांगी आणि येळेगाव माळावर असलेल्या पांगळे आणि खांडेकर यांच्या बेदाणा शेड येथे काम केलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाची दहशत आता वाडी आणि वस्तीत पोचली आहे. 

हेही नक्‍की वाचा : धक्‍कादायक ! लॉकडाउन असतानाही 11 जणांनी गाठले ग्वाल्हेर 

खांडेकर आणि पांगळे यांच्या बेदाणा शेडपासून तीन किलोमीटर असलेल्या गावडेवाडी, येळेगाव, वांगीतील ठेंगीलवस्ती परिसराला प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र केले आहे. गावकऱ्यांनी कोरोनाची धास्ती घेतली असून अन्य व्यक्तीसाठी गावात प्रवेशबंदी केली आहे. एरवी गावच्या पारावर, झाडाखाली, शाळेच्या पटांगणात, पानपट्टीसमोर दिसणारी मंडळी आता गडप झाली आहे. ज्याला त्याला कोरोनाची भीती वाटू लागल्याने या भागात कमालीची शांतता आणि अस्वस्थता पसरली आहे. तोंडाला मास्क आणि भेटल्यानंतर पहिल्यांदा हॅण्ड सॅनिटायझरचा वापर आता सर्रास होत आहे. बुधवारी तपासणीसाठी नेलेल्या या भागातील नागरिकांचे रिपोर्ट काय आले? याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. या बेदाणा शेडपासून सात किलोमीटर परिसरात येणारे वांगी, मनगोळी, कंदलगाव, निंबर्गी, मंद्रूप, वडकबाळ या परिसराला बफर क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी आज स्वतः या सर्व भागाची बारकाईने पाहणी केली. ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत. या बेदाणा शेड ठिकाणी काम करण्यासाठी वडकबाळ येथील महिला येतात. या महिलांना ने-आण करणारे वाहक, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाने मंद्रूप येथील किराणा दुकानातून साहित्य खरेदी केलेले दुकान, दुकानात काम करणारे कामगार, दुकानाचा मालक, बेदाणा शेडसाठी ग्रेडिंग मशिन ठिकाणी काम करणारे मजूर पुरविणारा मुकादम यांना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. त्या कामगाराच्या संपर्कात या भागातील अनेक व्यक्ती असल्याचे आज समोर आले. पांगळे यांच्याकडे अत्याधुनिक बेदाणा शेड असल्याने तेथे दक्षिण सोलापूर तालुक्‍यासह शेजारच्या मंगळवेढा तालुक्‍यातील, कर्नाटकातील काही शेतकऱ्यांनी भेट दिल्याचे समोर आले असून भेट देणाऱ्यांचा शोध प्रशासन घेत आहे. 

हेही नक्‍की वाचा : सकाळ ब्रेकिंग ! आयुष्यमान भारत योजनेतील दवाखान्यांना टाळेच 


संपर्कातील व्यक्‍ती 14 दिवस निगराणीखाली 
बेदाणा शेडपासून तीन किलोमीटर परिसर हा प्रतिबंधित परिसर आहे. या परिसरातील कुटुंबांची 14 दिवस आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइनमध्ये पाठविण्यात आले आहे. उर्वरित व्यक्तींचा शोध घेत आहे. 
- राहुल देसाई, गटविकास अधिकारी, दक्षिण सोलापूर 


पांगळे वस्तीचे सर्व रस्ते लॉकडाउन 
गावातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला असलेल्या व्यक्तीची यादी केली जात आहे. बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांनी आमच्या गावात बंदोबस्त वाढविला आहे. पांगळे वस्तीला जाणारे रस्ते बंद केले आहेत. 
- गंगाधर सारवडे, उपसरपंच, येळेगाव 


धोका अन्‌ भिती वाटत आहे 
अन्य गावातील व्यक्ती आमच्या गल्लीतून पेट्रोलपंपकडे जातात. कालपरवापर्यंत कोरोना अन्य देशात, पुणे आणि मुंबईत आहे असे वाटत होते. आमच्या भागातून गेलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा धोका आपल्यापर्यंत आल्याची भीती वाटू लागली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही हा रस्ता बंद केला आहे. 
- नितीन उडाणशिव, कंदलगाव 

हेही नक्‍की वाचा : मोठी बातमी ! जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीची ठरली वेळ 

संपूर्ण कुटुंबाची नियमित आरोग्य तपासणी व्हावी

वांगी गावात अद्याप कोणत्याही प्रकारची तपासणी झालेली नाही. ग्वाल्हेर येथे आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आमच्या गाव हद्दीतील बेदाण शेड येथे काम केले आहे. गावातील संपूर्ण कुटुंबाची नियमित आरोग्य तपासणी व्हावी. 
- महेश सोनवणे, वांगी 

वाहनांना गावात प्रवेश बंद ​
आमच्या गावात अन्य ठिकाणचा कोणीही व्यक्ती येऊ नये आणि गावातील व्यक्ती बाहेर जाऊ नये याची खबरदारी आम्ही घेतली आहे. अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तूंशिवाय अन्य वाहनांना गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावातील व्यक्तींची तपासणी केली जात आहे. 
- सुखदेव गावडे, गावडेवाडी 

go to top