
बार्शी(सोलापूर): शहरातील व्यापाऱ्यांनी स्वतःची कोरोना चाचणी आधी करून घ्यावी व नंतर दुकाने उघडावीत असे आदेश निघाल्याने या आदेशाला कॉंग्रेसने विरोध दर्शवला आहे.
शहरातील सर्व व्यापारी व आस्थापनाधारकांची कोविड-19 ची चाचणी करणे बंधनकारक आहे, असा आदेश सहाय्यक कामगार आयुक यांनी ता. 26 रोजी काढला आहे. हा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी सोलापूर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, पालकमंत्री, तहसीलदार यांना बार्शी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. जीवनदत्त अरगडे व युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष निखिल मस्के यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.
बार्शी शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आस्थापनाधारक व्यावसायिक यांनी स्वतःची कोरोना चाचणी करूनच दुकाने उघडावीत, असा तहसीलदार यांनी आदेश करण्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांना व्यापाऱ्यांशी चर्चा करून अशा स्वरूपाचा आदेश काढण्याबाबत सुचित केले होते. अशा स्वरूपाचा जाचक नियम संपूर्ण देशात कुठेही, कोणत्याही अधिकाऱ्याने, कोणत्याही हॉटस्पॉटमध्ये केल्याचे आढळून येत नाही. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन, अशा प्रकारच्या चाचण्या करण्याचा आदेश काढला आहे. अशा आदेश सहाय्यक कामगार आयुक्त यांना काढण्याबाबत कामगार कायद्यांमध्ये कोठेही तरतूद नाही. शहरांमध्ये सुमारे बारा हजारपेक्षा जास्त आस्थापना नोंदणीकृत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व आस्थापनाधारकांच्या कोविड चाचण्या सरसकट व लक्षणे न पाहता अनिवार्य करणे जाचक आहे. चाचणीसाठी 3 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. मग तोपर्यंत दुकाने बंद ठेवायचे का? जाचक आदेश काढण्याचे आवश्यकता नसल्याने तात्काळ हा जाचक आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
चाचणीशिवाय दुकाने सुरू केली नोंदणी रद्द
तहसीलदार यांनी हा निर्णय घेतला आहे. शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यास आळा घालण्यासाठी विविध योजना प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. यामुळे प्रसार टाळता येईल. चाचणी केल्याशिवाय अस्थापना, दुकान सुरु करता येणार नाही. अन्यथा कार्यालयाकडील नोंदणी रद्द करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- एन.एल.येलगुंडे, सहायक कामगार आयुक्त, सोलापूर
संपादनः प्रकाश सनपूरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.