पत्नीच्या धाडस : बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविले पतीला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

बिबट्या चावल्यानंतर जखमी असलेल्या व्यक्तीच्या जखमेच्या बाजूला इम्युनी ग्लोबिन नावाचे इंजेक्‍शन द्यावे लागते. त्यानंतरच त्या ठिकाणचे सिजरिंग करता येते. त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. 

पेनूर (सोलापूर) :  गेल्या 15 दिवसांपासून मोहोळ तालुक्‍यातील पाटकूल, टाकळी, पेनूर व तुंगत आदी भागांत बिबट्यासदृश प्राण्याने उच्छाद मांडला असून हा बिबट्या शेळ्या व लहान जनावरांवर हल्ला करीत होता. मात्र, शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तुंगतमधील रामेश्‍वर अनंता पाटील (वय 45) यांच्यावर हल्ला केल्यामुळे कोरोनाच्या काळात शेतकरी रोगाला घाबरला नाही परंतु रात्री-अपरात्री बिबट्यामुळे धास्तावला आहे. 

हेही वाचा : दुकाने सुरु करण्याच्या मागणीसह व्यापारी महापालिकेत

पिकांना पाणी देण्यासाठी गेले रात्री 
तुंगत येथील रामेश्‍वर पाटील शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गुरुवारी रात्री 12 वाजता पत्नीसोबत गेले होते. रात्री दोन वाजता वीज गेल्यामुळे ते नांगरलेल्या मोकळ्या शेतातच झोपले होते. पहाटे चारच्या दरम्यान रामेश्‍वर पाटील मोठमोठ्याने ओरडू लागले. त्या वेळी शेजारीच असलेल्या त्यांच्या पत्नीला जाग आली. बिबट्याच्या लहान पिल्लाने त्यांच्यावर हल्ला केला होता. या वेळी बिबट्याला त्यांच्या पत्नीने धाडस दाखवत ढेकळाने हुसकावून लावत पतीला वाचवले. या वेळी त्यांच्या नाकाला व चेहऱ्याला दुखापत झाली आहे. 

हेही वाचा : सोलापुरातही श्री गणेशोत्सव होणार साधेपणाने साजरा

त्यांच्याकडे बघून गुरकत होता 
बिबट्याचे लहान पिल्लू व बांधावर असणारा दुसरा बिबट्या त्यांच्याकडे बघून गुरकत होता. या वेळी रामेश्‍वर पाटील व त्यांची पत्नी सविता पाटील हे त्या बिबट्यापासून आपला बचाव करण्यासाठी तिथून वस्तीकडे धावत आले. या घटनेची माहिती मिळताच सरपंच आगतराव रणदिवे, पोलिस पाटील पंडित देठे यांनी धाव घेतली. रामेश्‍वर पाटील यांना प्राथमिक उपचारासाठी तुंगतमधील डॉ. योगेश रणदिवे यांच्याकडे दाखविण्यात आले. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी दाखवल्यानंतर त्यांना सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयात जाण्याचे सांगितले. बिबट्या चावल्यानंतर जखमी असलेल्या व्यक्तीच्या जखमेच्या बाजूला इम्युनी ग्लोबिन नावाचे इंजेक्‍शन द्यावे लागते. त्यानंतरच त्या ठिकाणचे सिजरिंग करता येते. त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. 

नागरिकांनी काळजी घ्यावी 
पाणी व शेळ्या असणाऱ्या पेनूर, पाटकूल, फुलचिंचोली, तुंगत या कॅनॉलच्या भागात बिबट्याचा वावर असून नागरिकांनी सावध राहावे. शक्‍यतो रात्री बाहेर पडू नये. रात्री हातात काठी व बॅटरी ठेवावी. बिबट्या समोर आल्यास आवाज केल्यानंतर जवळ थांबत नाही. परिसरातील सर्व ठिकाणी वनविभागाचे अधिकारी जाऊन जागृती करीत असून नागरिकांना सूचना देत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात तीन पिंजरे लावण्यात आले असून लवकरात लवकर बिबट्याला पकडले जाईल. 
- जयश्री पवार, 
वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहोळ विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife's courage: Husband rescued from leopard attack