शाळेत एकत्र खेळणे व डबा खाणे अन धम्माल मस्तीची मजा संपेल का? 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 19 जून 2020

शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर सध्या पुस्तकांचे वाटप केले जात आहे. शिक्षण खात्याने लॉकडाउननंतर भरणाऱ्या शाळांबाबत अनेक प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार आता मुलांना शाळेत अनेक बंधने पाळावी लागणार आहेत. 

सोलापूर: लॉकडाउननंतर भरणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळताना आता एकत्र डबा खाणे, खेळणे, एका बेंचवर बसणे यातून मिळणाऱ्या निरागस आनंदापासून वंचित राहावे लागेल की काय, अशी शक्‍यता आहे. कारण, शाळांमधून कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने या बाबींवर प्रतिबंध घालण्यासाठी नियोजन केले जात आहे. 

हेही वाचाः फेसबुकवर लाईव्हद्वारे रविवारी जागतिक योग दिन होणार साजरा 

शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर सध्या पुस्तकांचे वाटप केले जात आहे. शिक्षण खात्याने लॉकडाउननंतर भरणाऱ्या शाळांबाबत अनेक प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार आता मुलांना शाळेत अनेक बंधने पाळावी लागणार आहेत. 

हेही वाचाः रुग्णसेवेसाठी सरसावले डॉक्‍टर असलेले प्रशासकीय अधिकारी 

लॉकडाउनच्या काळात घरीच असलेल्या माध्यमिक किंवा उच्चमाध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाची जाणीव बऱ्यापैकी झाली आहे. मात्र, यामुळे प्राथमिक गटातील मुलांच्या निरागसपणाला या बंधनाचा धक्काच बसेल अशी स्थिती आहे. बालपणाशी जोडलेला हा निरागस आनंद कोरोनामुळे हिरावला गेला तर त्याचे परिणाम तरी काय होती याची चिंता व्यक्त केली जात आहे. 
शाळांमध्ये सध्या नेमकी विद्यार्थी संख्या व बेंचेसची उपलब्धता तपासली जात आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल यासाठी तुलनात्मक आकडेवारी गोळा केली जात आहे. ज्या शाळामध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे, तेथे शाळा दोन शिफ्टमध्ये करण्यासाठी वेळापत्रके तयार केली आहेत. अधिक विद्यार्थी संख्येच्या शाळांमध्ये एक दिवसाआड शाळा भरवण्याचा विचार शिक्षण खात्याकडून केला जात आहे. 
शाळेमध्ये पूर्वी विद्यार्थी एकत्र गोल बसून डबा खात असत. आता सोशल डिस्टन्स व डबा खाताना मास्क लावता येत नसल्याने कदाचित एकत्र डबा खाता येणार नाही. एकमेकांना पेन्सिल, पेन व वह्यांची देवाणघेवाण हे देखील बंद होणार आहे. प्रत्येक बेंचवर विद्यार्थ्याचे नाव टाकून त्याच बेंचवर विद्यार्थ्यांना बसावे लागले. एका बेंचवर बसून विद्यार्थ्यांमध्ये वाढलेली मैत्री भावना देखील यापुढे राहणार नाही. वैयक्तिक स्वच्छतेचे अनेक नियम विद्यार्थ्यांना पाळावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांचा एकत्र खेळणे व डबा खाण्याचा आनंद हिरावून घेतला जाण्याची शक्‍यता आहे. यासोबतच एक वाहनातून एकत्र शाळेत येणे, सामूहिक गाणी व पाठांतर अशा अनेक बाबींमध्ये सोशल डिस्टन्सची अट असेल. शाळेत विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग होऊ नये, या बाबीकडे शाळा प्रशासनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागणार आहे. एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या सामूहिक विकासाला फार मोठा अडथळा होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will the fun of playing and eating together at school end?