
मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना संकटाचा प्रादुर्भाव तालुक्यात वाढत असताना गटविकास अधिकारी रजेवर गेल्यामुळे सध्या पंचायत समितीचा कारभार अधिकाऱ्याविना सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेची ससेहोलपट होत आहे. तातडीने गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तालुक्यात लॉकडाउन केल्यामुळे ग्रामीण भागातून पंचायत समितीकडे येणारा ओघ बंद झाला. त्यामुळे मार्चअखेर ग्रामीण जनतेचे घरकुल, मनरेगा, कृषी, शौचालय, रस्ते व इतर बांधकामांच्या देयकांसाठी थांबावे लागले. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च, एप्रिल मेमध्ये देखील कायमच राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शासकीय कार्यालय उघडल्यामुळे ग्रामीण नागरिक आपल्या प्रलंबित कामांसाठी पंचायत समितीला हेलपाटे मारत आहेत. पण बहुतांश कामे कर्मचाऱ्यांच्या कमी उपस्थितीमुळे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत उपलब्ध मनुष्यबळाकडून काम करून ग्रामीण जनतेच्या प्रश्नांचा निपटारा करणे आवश्यक आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत आहे. ग्रामसेवकांनी आपल्या मुख्यालयात राहून कोरोना विषाणूची वाढणारी साखळी नियंत्रित करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक आहेत. परंतु यावर नियंत्रण असणाऱ्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. तरीही विद्यमान गटविकास अधिकारी सध्या रजेवर गेल्यामुळे प्रलंबित कामात आणखीन भर पडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची घरकुल, मनरेगा, कृषी, शौचालय व इतर बांधकामांची देयके अडकून पडली आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून आर्थिक अडचणीत आलेला लाभार्थी आता पुन्हा अडचणीत आला आहे. नवीन प्रभारी पदभार दिले नसल्यामुळे सध्या पंचायत समितीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचे दिसून येऊ लागले.
यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता, त्या अधिकाऱ्याचा मोबाईल बंद असल्यामुळे मंगळवेढ्यास प्रभारी गटविकास अधिकारी कधी मिळणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट जनतेसाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी किती गांभीर्याने घेतले, यावरून स्पष्ट होत आहे.
याबाबत माजी सभापती प्रदीप खांडेकर म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागातील जनतेचे रखडलेले प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी तातडीने गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा तातडीने निपटारा करावा.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.