जागतिक हृदयदिन विशेष : भावनांचे आश्रयस्थान अन्‌ जीवनाचे मर्म म्हणजे हृदय ! उत्तम आरोग्यासाठी घ्या काळजी 

तात्या लांडगे 
Tuesday, 29 September 2020

भावनांचे आश्रयस्थान आणि मानवी जीवनाचे मर्म म्हणजे हृदय असून, ते शरीराचे इंजिन आहे. अविश्रांत धडधडत राहणारे हृदय हा मांसल आणि मृदू अवयव आहे. शुद्ध, सात्त्विक, ताजे अन्न खाण्याने हृदय स्वस्थ राहते. उत्तम निरामय दीर्घायुष्यासाठी हृदयाची काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे मत डॉ. गायत्री देशपांडे यांनी जागतिक हृदय दिनाच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केले. 

भावनांचे आश्रयस्थान आणि मानवी जीवनाचे मर्म म्हणजे हृदय असून, ते शरीराचे इंजिन आहे. अविश्रांत धडधडत राहणारे हृदय हा मांसल आणि मृदू अवयव आहे. शुद्ध, सात्त्विक, ताजे अन्न खाण्याने हृदय स्वस्थ राहते. उत्तम निरामय दीर्घायुष्यासाठी हृदयाची काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे मत डॉ. गायत्री देशपांडे यांनी जागतिक हृदय दिनाच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केले. 

शुद्ध, सात्त्विक, ताजे अन्न खाण्याने हृदय राहते स्वस्थ 
शरीराला रक्ताचा नियमित पुरवठा करण्याचे कार्य हृदय पेशींच्या आकुंचन- प्रसरणावर अवलंबून आहे. शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारे आणि अशुद्ध रक्त गोळा करणारे हे इंद्रिय खूप अद्‌भुत आहे. हृदयाची अभिव्यक्ती गर्भावस्थेत चौथ्या महिन्यात होते, म्हणजेच तेव्हापासून चेतना व्यक्त होते. गर्भाच्या इच्छा मातेच्या डोहाळ्यामार्फत व्यक्त होतात. त्या पुरविल्या जाव्यात, असे प्राचीन शास्त्र व परंपरा सांगतात. डोहाळे पुरवले नाहीत, तर त्या गर्भाच्या हृदयावर दुष्ट प्रभाव होतो व पुढील आयुष्यात रोगाची बीजे रोवली जातात. हृदयाचे रक्षण करण्यासाठी आहार आणि विहार ही दोन्ही चाके यथायोग्य हवीत. हृदयाचे पोषणही अन्य अवयवांप्रमाणे आहारापासूनच होते. त्यामुळे शुद्ध, सात्त्विक, ताजे अन्न सेवन करणे हा हृदय स्वस्थ ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. 

शपथ घेऊया... "हृदयाला निरोगी ठेवण्याची !' 
विविध भावनांचे आश्रयस्थान हे हृदयच आहे. त्यामुळे त्यांचा उद्रेक हृदयाचे आरोग्य धोक्‍यात आणतो. अति शोक, अति क्रोध, अति ईर्षा, अति आश्‍चर्य आदी सर्व भाव हृदयाला त्रस्त करतात. "चिंतातुर जंतू' हे नेहमीच हृदयरोगाच्या मार्गावर चालत असतात. म्हणूनच प्रसन्न मन हा हृदयरोग टाळण्याचा एक महत्त्वाचा उपाय होय. यासाठी प्राणायाम, योग, ध्यानधारणा आदींबरोबरच इंद्रिय संयमही तितकीच महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तेव्हा आजच्या जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने शपथ घेऊया... "हृदयाला निरोगी ठेवण्याची !' योग्य प्रमाणात केलेला व्यायाम हृदयाच्या पेशींची शक्ती वाढवून त्यांना स्वस्थ ठेवतो. प्राणायाम हृदय व फुफ्फुसे या दोन्हींचे बल वाढविणारा आहे. व्यायामाबरोबरच योग्य प्रमाणात (सहा-सात तास) घेतलेली गाढ झोप हीसुद्धा हृदयाच्या आरोग्यासाठी हितकर ठरते. अपुरी झोप, वारंवार खंडित होणारी झोप हृदयाच्या ठिकाणी वैगुण्य उत्पन्न करते. तसेच दिवसा घेतलेली झोपही अयोग्यच होय. वारंवार मलमूत्र, अपान (अधोवात) यांच्या वेगाचे धारण करणे किंवा त्यांना जबरदस्तीने उत्पन्न करणे या दोन्ही गोष्टी हृदयाच्या अनारोग्याचे कारण ठरतात. म्हणूनच वरवर पाहता क्षुल्लक वाटणाऱ्या मलावरोधसारख्या लक्षणाची वेळीच चिकित्सा करावी. 

"स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम्‌' 
आयुर्वेदाचे प्रयोजनच मुळी "स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम्‌' असे आहे. त्यामुळे हृदयरोगाची काळजी करण्यापेक्षा हृदय स्वस्थ राहील याची काळजी घेतलेली उत्तम. त्यासाठी आयुर्वेदामध्ये आहार-विहार याबरोबरच हृदय बस्तिसारखे अनेक उपाय वर्णन केले आहेत. अर्थात त्यांचा उपयोग तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. 
- डॉ. गायत्री समीर देशपांडे, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर 

अशी घ्यावी काळजी 

  • दररोज ताजे गरम जेवण घ्यावे, भूक लागल्यानंतरच जेवण करावे, भरभर किंवा सावकाश जेवू नये 
  • जेवताना मधून अधून थोडे थोडे पाणी प्यावे, जेवताना थोडी भूक शिल्लक ठेवून जेवावे 
  • जेवणानंतर लगेच कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू नये, रात्रीचे जेवण शक्‍यतो लवकर घ्यावे, भूक नसताना जेवू नये 
  • स्निग्ध पदार्थ खाताना विशेष काळजी घ्या, साजूक तूप असले तरी ते प्रमाणातच खावे 
  • तेलाचा विचार करताना करडई तेल त्रिदोष प्रकोपक असल्याने खाऊ नये 
  • शेंगदाणा तेलातील ओमेगा तीन व ओमेगा सहाचे प्रमाण कमी व योग्य असल्याने ते वापरावे 
  • अधिक रुक्ष व शुष्क आहार सेवन करावे, जास्त आंबट, तिखट, खारट पदार्थ सेवन करावेत 
  • मैदा, डालडा, पामतेल, बेकिंग सोडा, क्षार इत्यादी पदार्थ अत्याधिक प्रमाणामध्ये सेवन करणे 
  • कडधान्य अधिक प्रमाणात व न संस्कार करता वारंवार खाणे, अत्याधिक व्यायाम हृदयासाठी हानिकारक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Heart Day Special : Eating pure, fresh food keeps the heart healthy