"या' जिल्हा परिषदेत पक्षनेते पदाला वादाचे ग्रहण 

"या' जिल्हा परिषदेत पक्षनेते पदाला वादाचे ग्रहण 

 सोलापूर ः जिल्हा परिषदेतील पक्षनेता कोण होणार यावरून वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावरून सदस्य अण्णाराव बाराचारे यांनी आज पक्षनेता पदाचा पदभार घेतला. मात्र, त्यांनी घेतलेला हा पदभार अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या सांगण्यावरून घेतला नसल्याचे पक्षनेते आनंद तानवडे यांनी सांगितले. त्यामुळे पक्षनेता या पदाला वादाचे ग्रहण लागल्याचे आज स्पष्ट झाले. 

जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याही एका पक्षाची सत्ता नाही. पदाधिकारीही एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेत नेमके सत्ताधारी कोण व विरोधक कोण? याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. त्यातच आता नियमबाह्य असलेल्या पक्षनेते पदावरून वादंग उठले आहे. भाजपचे अध्यक्ष श्री. पवार यांनी 14 फेब्रुवारीला अध्यक्षांना पत्र देऊन पक्षनेतेपदी बाराचारे यांची नियुक्ती करण्यास सांगितले होते. मात्र, अध्यक्षांनी अद्यापही हा विषय मार्गी लागला नसल्याचे आज पुन्हा स्पष्ट केले. मी पाच पक्षांनी केलेला अध्यक्ष आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करूनच पक्षनेतेपदाचे नाव जाहीर करणार असल्याचे अध्यक्ष श्री. कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

दरम्यान, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांची बाजार समितीमध्ये बैठक घेतली. त्या बैठकीत आनंद तानवडे यांच्याकडेच पक्षनेते पद राहू द्यायला हवे असा विषय मांडण्यात आला. पण, श्री. देशमुख यांनी पक्षनेते व विरोधी पक्षनेते ही दोन्ही पदे नियमबाह्य असतील तर त्या दोन्ही कार्यालयांना कुलूप लावण्यास सांगितल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू होती. श्री. बाराचारे यांनी आज सकाळी पक्षनेते कार्यालयाचा ताबा प्रशासनाच्या पत्रावरून घेतला. सायंकाळी पाचच्या सुमारास माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना सोलापूर सोशल फाउंडेशनच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. त्यावेळी श्री. बाराचारे यांनी श्री. देशमुख यांना त्यांच्या कार्यालयात येण्याची विनंती केली. त्यावरून श्री. देशमुख पक्षनेत्यांच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी बाराचारे यांचा सत्कारही त्यांनी केला. त्यावेळी अध्यक्षांच्या दालनात श्री. तानवडे उपस्थित होते. पण, ते पक्षनेत्यांच्या दालनात आले नाहीत. श्री. देशमुख यांनी निवडीबद्दल बाराचारे यांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष पवार यांनी बाराचारे यांच्या निवडीचे पत्र दिल्याचे माजीमंत्री देशमुख यांनी पत्रकारांनी विचारल्यावर सांगितले. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे बाराचारे यांनी सांगितले. 

पक्षनेत्याच्या प्रकरणात प्रशासनावर आली नामुष्की 
जिल्हा परिषद प्रशासनाने श्री. बाराचारे यांना पक्षनेत्याचे दालन घेण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार श्री. बाराचारे यांनी आज सकाळी दालनाचा ताबा घेतला होता. मात्र, प्रशासनाकडे श्री. तानवडे यांनी तक्रार केल्यानंतर सायंकाळी प्रशासनाने बाराचारे यांना दालनाचा दिलेला ताबा तूर्त रद्द करण्यात येत असल्याचे पत्र काढले. पक्षनेत्याचे दालन घ्या म्हणून पत्र देणाऱ्या प्रशासनाला त्यांचाच पूर्वीचा आदेश तूर्तास रद्द करण्याचे पत्र काढावे लागले. यावरून पक्षनेत्याच्या विषयात प्रशासनावरही नामुष्की आल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्याचे प्रशासनाला काहीच सोयरसुतक वाटत नाही हे विशेष. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com