"झेडपी'चे सीईओ स्वःताच्या बचावासाठी घेताहेत अधिकाऱ्यांचा बळी? 

"झेडपी'चे सीईओ स्वःताच्या बचावासाठी घेताहेत अधिकाऱ्यांचा बळी? 

सोलापूर ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी कोणताच प्रश्‍न मार्गी लावला नाही. अनेकवेळा अनुकंपा भरतीबाबत पदाधिकाऱ्यांनी सांगूनही त्याकडे दुर्लक्षच केले. त्यातच आता कोरोनाला आळा घालण्यात जिल्हा परिषद प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यात आपला बळी जाऊ नये, यासाठी श्री. वायचळ यांनी अधिकाऱ्यांचा बळी घेण्याचे नियोजन केल्याने काम करणारे अधिकारी नाऊमेद झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरु आहे. 

आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन काम करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी कामाचे नियोजन केल्याचे कागदोपत्री दाखविले. विभाग प्रमुखांना तालुकानिहाय जबाबदारी दिली. एवढेच नाही तर अनेकांना कोविड केअर सेंटरची नेमणूकही दिली. त्यामुळे कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले. अशा स्थितीत अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज होती. मात्र, जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात येताच त्यांनी आपल्याच सहकाऱ्यांचा बळी देण्याचा डाव आखला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत काम करत असतानाही आपल्याच सहकाऱ्यांना त्यांनी नोटिसा दिल्या आहेत. 

श्री. वायचळ यांनी पदभार घेतल्यापासून काही अपवाद वगळता कार्यालयात बसूनच काम करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी काय आहे, याची फारशी माहितीही त्यांना नाही. त्यातच आता जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असल्यामुळे प्रशासन कुजकामी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच श्री. वायचळ यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी त्यांना नोटिसा देऊन त्यात भरच टाकली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. हे संकट आता आपल्या अंगलट येत असल्याची कुणकुण त्यांना लागली असावी. या सगळ्या प्रकारातून आपली सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा बळी घेण्याचा डाव आखला असल्याची चर्चाही जोरात सुरु आहे. एका अधिकाऱ्यांना दोन-तीन प्रकारची कामे करण्याची जबाबदारी दिली आहे. ती कामे करताना या कोरोनाच्या काळात त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी कोणतीही साधने दिली नाहीत. असे असताना काम करत नसल्याचे कारण सांगून नोटिसा मात्र दिल्या आहेत. अधिकारी या नोटिसांना काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. या विषयी श्री. वायचळ यांच्याशी आठ वाजून 50 मिनिटांनी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल स्विकारला नाही. 

आरोग्य विभाग सुस्तावला 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्याला खूपच उशिर केला. कार्यालयीन प्रमुख म्हणून श्री. वायचळ यांनी त्याकडे लक्ष देणे अपेक्षित होते. मात्र, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कान टोचल्यानंतर ती प्रक्रिया आता सुरु केली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती दिलीप चव्हाण यांनी याप्रकरणी नाराजीही व्यक्त केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com