सांगलीची पोरं हुश्शारच! विद्यार्थ्यांनी बनवलेल्या लघुउपग्रहातून मिळणार ही महत्वाची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

लघुउपग्रह बनविण्यासाठी ऑनलाईन वेबिनार पुणे येथील निर्मिती कार्यशाळेत पूर्ण झाले आहे

मिरज (सांगली) : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये देखील भरारी मारली आहे. महानगरपालिकेच्या पाच शाळांतील १० विद्यार्थ्यांनी लघुउपग्रह बनविला आहे. त्याचे प्रक्षेपण रविवारी (७) रामेश्वरम (तामिळनाडू) येथून होणार आहे. उपग्रहाचे सर्वसाधारण वजन २५ ते ८० ग्रम असून उपग्रह हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित करून ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर ४ ते ६ तासांसाठी स्थिर होणार आहे. या उपग्रहाद्वारे वातावरणातील बदल, सूर्याची अतिनील किरणे, ओझोनचा थर इत्यादी माहिती मिळविता येणार आहे. 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे स्पेस रिसर्च पेलोड क्‍युबस चॅलेंज २०२१ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कलाम स्वप्नातील भारत घडविण्यासाठी, शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच स्पेस टेक्‍नॉलॉजी बद्दल जिज्ञासा निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 

हेही वाचा - व्वा रे बहाद्दर! गाडीचा हॉर्न वाजवत गव्यांच्या कळपातून काढली वाट -

देशातून एक हजार विद्यार्थ्यांकडून शंभर लघुउपग्रह करून अवकाशात सोडण्यात येणार आहे. यामध्ये सांगली महापालिकेच्या शाळेतील दहा विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. लघुउपग्रह बनविण्यासाठी ऑनलाईन वेबिनार पुणे येथील निर्मिती कार्यशाळेत पूर्ण झाले आहे. सर्व १०० लघुउपग्रह रविवारी रामेश्वरम येथून अवकाशात प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.

या विद्यार्थ्यांना शिक्षक संतोष पाटील, मातेश कांबळे, कल्पना माळी, विशाल भोंडवे, अनिता पाटील, अशोक उंबरे, आश्विनी माळी, शैलजा कोरे, फराह सुलताना कुरेशी, नजमा मारुफ यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रकल्पासाठी सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. याचे नियोजन शिक्षण विभागाचे सहायक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे यांनी केले आहे.

हे विद्यार्थी सहभागी

या उपक्रमात महानगरपालिकांचे १० विद्यार्थी सहभागी आहेत. यामध्ये लखन हाके, ओंकार मगदूम, किशोरी मादीग, प्रतीक्षा मुडशी, योगेश कुरवलकर, दर्शन बुरांडे, साकीब सय्यद, समीर शेख, विजय हिरेमठ, राजू भंडारे हे सहभागी विद्यार्थी आहेत. 

हेही वाचा - फसवणूक प्रकरणी माजी सभापतींना अटक ; शासकीय निधीचा केला अपहार -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asteroid prepared by a corporation school students in sangli