#SaathChal वारीत विद्यार्थी करणार ‘स्वच्छ सेवा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

सातारा - माउलींच्या दर्शनाच्या ओढीने अलंकापुरीकडे वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांतील दोन हजार विद्यार्थी वारीत ‘स्वच्छ सेवा’ करणार आहेत. या उपक्रमात प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील ४० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

सातारा - माउलींच्या दर्शनाच्या ओढीने अलंकापुरीकडे वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांतील दोन हजार विद्यार्थी वारीत ‘स्वच्छ सेवा’ करणार आहेत. या उपक्रमात प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील ४० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी सोहळा शुक्रवारी (ता. १३) जिल्ह्यात येत आहे. त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू आहे. या सोहळ्यातून लाखो भाविक जिल्ह्यात येतात. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड येथे जिल्ह्यात या पालख्यांचा मुक्काम असतो. लाखोंच्या संख्येतील भाविकांमुळे वारी मार्गात कचराही मोठ्या प्रमाणावर होतो. विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी भाविक जास्त असतात. तसेच त्या ठिकाणी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अगदी गोव्यातूनही भाविक माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येतात.

त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणावर होतो. ही वारी स्वच्छ व्हावी यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात. आता वारीतील स्वच्छतेचा वसा शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. आळंदी ते पंढरपूर स्वच्छ वारीच्या उपक्रमात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांतील दोन हजार विद्यार्थी वारकरी आणि भाविकांचे स्वच्छतेबाबत प्रबोधन करणार आहेत. त्यासाठी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने पुढाकाराची भूमिका घेतली आहे. नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. जी. के. गायकवाड यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी प्राचार्य डॉ. के. जी. कानडे उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी प्रा. नंदकुमार माने, प्रा. राजेंद्र यादव, शुभम डांगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या वारीत हे विद्यार्थी लोणंद ते बरड येथे वारकऱ्यांचे प्लॅस्टिक मुक्ती, शौचालयांचा वापर व एकूणच स्वच्छतेबाबत प्रबोधन करणार आहेत. याबाबत श्री. गायकवाड यांनी कार्यक्रम अधिकाऱ्यांना नियोजनाबाबत सूचना केल्या. प्राचार्य कानडे यांनीही मार्गदर्शन केले.

महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ‘एनएसएस’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अंगी बिंबवली आहे. विद्यार्थी स्वतः स्वच्छतेसाठी प्रयत्न करतील तसेच ते सर्वांचे प्रबोधन करणार आहेत. यावर्षीची वारी निश्‍चितच ‘स्वच्छ वारी’ असेल.
- प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स

Web Title: #SaathChal Wari Palkhi NSS student cleaning service Shivaji University