
अद्याप कोरोनाची धास्ती या शाळा व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षाचे धोरण ठरवताना त्याची मोठी अडचण होणार आहे.
सांगली : कोरोना नियंत्रणात आल्यानंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्याला आता आठवडा उलटून गेला आहे, मात्र अद्याप एक लाखाहून अधिक विद्यार्थी हे शाळेकडे फिरकलेले नाहीत. 160 शाळांनी कुलुप काढलेले नाही. अद्याप कोरोनाची धास्ती या शाळा व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षाचे धोरण ठरवताना त्याची मोठी अडचण होणार आहे.
जिल्ह्यात 15 मार्चपासून शाळा बंद झाल्या होत्या. आठ महिन्यानंतर म्हणजे 23 नोव्हेंबरपासून त्या पुन्हा सुरु करण्याच आदेश देण्यात आले. त्याच काळात देशात दिल्ली, गोवा आदी राज्यांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली. महाराष्ट्रात ती नियंत्रणात असली तरी देशातील वाढीचा मानसिक परिणाम राज्यात मोठ्या प्रमाणात जाणवला. अगदी लॉकडाऊनच्या अफवाही उठल्या. त्यातून शाळा सुरु करण्यात आल्या. पहिल्या दिवशी 590 शाळा सुरु झाल्या. आजही तेवढ्याच शाळा सुरु आहेत.
हेही वाचा - कर्नाटक सरकारची पुन्हा दडपशाही; निवडणूकीचे अर्ज मराठीतून देण्यास नकार
जिल्ह्यात एकूण शाळांची संख्या 740 आहे. येथील विद्यार्थी संख्या 1 लाख 47 हजार 442 आहे. त्यातील 27 हजार 300 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. सध्या एक आड एक दिवस शाळा भरत आहे. त्याहिशेबाने रोज 18 टक्के म्हणजे दोन दिवसांची सरासरी 35 टक्के हजेरी दिसत आहे. अद्याप एक लाखभर विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी आज या स्थितीचा आढावा घेतला.
आजपासून शाळा सुरळित सुरु होतील आणि किमान 40 टक्क्यांपर्यंत हजेरी असेल, अशी अपेक्षा होती. तसे झाले असते तर 80 टक्के विद्यार्थी एक आड एक दिवस शाळेत दिसले असते. वास्तविक, दोन्ही दिवसांचे मिळून 35 टक्केच विद्यार्थी येत असल्याने अडचणी वाढणार आहेत. या शैक्षणिक वर्षाचे धोरण ठरवताना अनुपस्थित राहणाऱ्या 65 टक्के विद्यार्थ्यांबाबत काय, याचा विचार करावा लागणार आहे.
हेही वाचा - गाळपात पुणे, उताऱ्यात कोल्हापूर विभाग ठरला भारी
संपादन - स्नेहल कदम