esakal | पहिली ते नववीचे विद्यार्थी परीक्षेविना पास; बेळगाव शिक्षण खात्याचा निर्णय

बोलून बातमी शोधा

null

पहिली ते नववीचे विद्यार्थी परीक्षेविना पास; बेळगाव शिक्षण खात्याचा निर्णय

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते नववीचे विद्यार्थी परिक्षेविना पास करण्यात आले आहेत. सोमवारी मूल्यांकनाचे काम पूर्ण करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना निकाल पाठवला जाणार असून प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना मंगळवारपासून 15 जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्यापासून प्राथमिक शाळांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट दिसून येणार आहे. तर दहावीच्या शाळा पुढील निर्णय आल्यानंतर सुरू केल्या जाणार आहेत. अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा नसताना पास करण्यात आले होते. तसेच कोरोनाचे संकट कमी होईल आणि शैक्षणिक वर्ष पूर्व पदावर येईल असे वाटत होते. मात्र कोरोनाची परिस्थिती कायम जैसे थे राहिल्याने पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळांचे शटर एक दिवसही उघडले नाही. सहावी ते नववीचे विद्यार्थी काही दिवस शाळेत दाखल झाले. मात्र पुन्हा कोरोना वाढल्याने शाळा बंद झाल्याने पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा तसेच मूल्यांकन आधारित निकाल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मूल्यांकनाचे काम पूर्ण करून निकाल तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा: कर्नाटकात लॉकडाऊन जाहीर झाल्याने आरसीयूच्या परिक्षा लांबणीवर

शाळांनी निकाल जाहीर केला असला तरी निकाल विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे पोहचवावा याबाबत कोणत्याही प्रकारची प्राथमिक माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक तयार करून शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार निकाल संकेतस्थळावर अपलोड केला आहे. ज्या दिवशी सूचना येईल त्याप्रमाणे विद्यार्थ्यांपर्यंत निकाल पोहोचला जाईल अशी माहिती शिक्षकांतर्फे देण्यात आली आहे. निकाल तयार झाल्यानंतर प्राथमिक शाळातील शिक्षकांना 15 जूनपर्यंत सुट्टी मिळणार आहे. सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांनाही सुट्टी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय होताच दहावीच्या विद्यार्थ्यांसह माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत दाखल व्हावे लागणार आहे.

"कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा नसताना पास करण्याऐवजी पर्याय नव्हता. मात्र मूल्यांकना आधारे निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता दिसून येणार आहे."

- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी