रेल्वेस्थानकात सुविधांसाठी १० कोटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर ६५ लाखांच्या खर्चातून प्रवाशांसाठी विश्रामगृहासह पादचारी पूल उभारण्यात आला आहे. याशिवाय, दोन रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण, आणखी एक नवीन फलाट होत आहे. यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर आहे. यातून पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. त्याचे उद्‌घाटन केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज येथे झाले.

कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला होता, त्यानुसार प्राप्त निधीतून स्थानकावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात विश्रामगृह उभारण्यात आले.

रेल्वेच्या प्रतीक्षेतील प्रवाशांना विशेषतः दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विश्रांती घेता यावी, यासाठी २४ आसनक्षमतेचे विश्रामगृह उभारले आहे. त्यात प्रवाशांना बारा तास सशुल्क राहता येणार आहे, तसेच राजारामपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर पादचारी पूल बनविला आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व बाजूने येणाऱ्या पादचाऱ्यांची सोय झाली, तसेच प्रवाशांना मुख्य रेल्वेस्थानकावर येण्याचा मार्ग खुला झाला. याचबरोबर पुलाशेजारीच तिकीटगृह उभारल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी नवी सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

अन्य सुविधा अशा
सध्या असलेल्या रेल्वे फलाटावर अन्य पूरक सुविधा करण्यात येणार आहेत. यात फलाट १ व २ चे विस्तारीकरण करण्यात येईल. दोन्ही फलाटांवर छत उभारण्यात येणार आहे; तर नवीन ५६२ मीटरचा फलाट तयार करण्यात येईल. तेथे २४ बोगी थांबू शकतील, अशी रचना असणार आहे. एका वेळी दोन फलाटांवर जाता येईल, अशी सोय असणारा सरकता जिना (एक्‍सीलेटर) बनविण्यात येणार आहे. याशिवाय पिण्याचे पाणी (नळ) सुविधा, नवीन बुकिंग ऑफिस आणि कॅंटीन सुविधा अधिक सक्षम करण्यात येणार आहेत.

शिष्टमंडळाने मानले मंत्री प्रभू यांचे आभार
कोल्हापूर - येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केली. यापूर्वी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबत  ललित गांधी यांच्यासह इतरांनी पाठपुरावा केला होता. आज याची घोषणा मंत्री सुरेश प्रभू यांनी केल्याबद्दल त्यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे श्री. गांधी व शिष्टमंडळाने आभार मानले. रमेश कारवेकर, रणजित पारेख, राजेंद्र शहा, अतुल लोंढे, आशिष पाटुकले, स्नेहल मगदूम आदी उपस्थित होते.

चित्रांतून कळणार कोल्हापूर
कोल्हापूरच्या चित्रकारांनी रंगवलेली कोल्हापुरातील ऐतिहासिक, धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांची चित्रे रेल्वेस्थानकावर लावण्यात येणार आहेत. त्याची पाहणी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केली. तैलरंगात तयार केलेली ही चित्रे रंकाळा, पंचगंगा घाट, शिवाजी विद्यापीठ, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, संध्यामठ अशा अनेक ठिकाणांची आहेत.

रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण
कोल्हापूर-पुणे मार्गावर विद्युतीकरण करण्यात येणार असून, त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे आगामी काळात विद्युत रेल्वेही या मार्गावर जलद गतीने धावणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 crores for the convenience of the railway station