esakal | सांगलीतील १०२ एसटी चालक-वाहकांना कोरोनाची बाधा ; रुग्णसंख्या वाढण्याचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

102 state transport driver are corona positive from return to mumbai in snagali the fear of increased figure in sangli

४२५ पैकी १०२ कर्मचारी परतल्यानंतर ते बाधित असल्याचा अहवाल आला. त्यामुळे संबंधित कर्मचारी आणि कुटुंबीयांची धास्ती वाढली आहे.

सांगलीतील १०२ एसटी चालक-वाहकांना कोरोनाची बाधा ; रुग्णसंख्या वाढण्याचा धोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : मुंबईत लोकल रेल्वेसेवा बंद असल्यामुळे ‘बेस्ट’ च्या मदतीसाठी जिल्ह्यातून गेलेल्या १०२ एसटी चालक-वाहकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ४२५ पैकी १०२ कर्मचारी परतल्यानंतर ते बाधित असल्याचा अहवाल आला. त्यामुळे संबंधित कर्मचारी आणि कुटुंबीयांची धास्ती वाढली आहे. पहिली बॅच परतल्यानंतर दुसरी ४२५ ची बॅच मुंबईला रवाना झाली असून ऐन सणासुदीच्या काळात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. एसटीच्या काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा - राज्यात पुन्हा एकदा हाय होल्टेज; तळ कोकणातल्या राजकारणावर प्रभाव -

मुंबई महापालिकेच्या ‘बेस्ट’ सेवेला मदत करण्यासाठी जिल्ह्यातून दोन आठवड्यांपूर्वी २०० चालक व दोनशे वाहक आणि इतर २५ कर्मचारी अशी ४२५ जणांची बॅच गेली होती. यामध्ये काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे असताना देखील त्यांना कारवाईची भीती दाखवून मुंबईला पाठवले. कवठेमहांकाळ आगारातील दोन कर्मचाऱ्याचा अहवाल प्रलंबित असताना देखील त्यांना पाठवले गेले. तेथे गेल्यानंतर ते बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला.

मुंबईत गेलेल्या कर्मचाऱ्यांना जेवण, राहणे, आंघोळीपासून सर्वच गोष्टींचा त्रास झाला. तसेच बसेस देखील निर्जंतुकीकरण केल्या जात नाहीत. मदतीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना तेथील नागरिकांकडून विचित्र वागणूक मिळाली. दोन दिवसांपूर्वी मुंबईला गेलेले ४२५ कर्मचारी जिल्ह्यात परतले. तेथेच अनेकांना कोरोनाची लागण झाली. परतलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यामध्ये दोन दिवसांत तब्बल १०२ चालक-वाहक कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.

१०२ कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, बसमधून प्रवास केलेले प्रवासी आणि संपर्कातील इतरांचा जीव टांगणीला लागला आहे. तसेच अद्याप काहींचा अहवाल प्रलंबित असून हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. मुंबईहून परतलेल्या ४२५ पैकी १०२ कर्मचारी कोरोना बाधित आढळले असून इतरांचा अहवाल प्रलंबित आहे. तेवढ्यात ४२५ जणांची दुसरी बॅच मुंबईला रवाना झाली आहे. ऐन दिवळीच्या तोंडावर हे कर्मचारी कोरोना घेऊन परततील अशी शक्‍यता वर्तवली जाते. 
सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळले जात असल्यामुळे कर्मचारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा - साखर कारखान्यांची एफआरपी प्रमाणित; दराबाबत उत्सुकता वाढलली

आकडा वाढण्याची भीती

मुंबईहून परतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सांगली आगारातील ६, मिरज ६, इस्लामपूर ६, विटा १४, आटपाडी १५, जत १५, कवठेमहांकाळ १४, तासगाव २४, शिराळा १६ याप्रमाणे आतापर्यंत १०२ कर्मचारी बाधित आढळले आहेत. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता वर्तवली जाते.

"एसटीचे अधिकारी उत्पन्न मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्‍यात घालून मुंबईला पाठवत आहेत. कर्मचारी आणि कुटुंबीयांचा संसार उद्‌ध्वस्त करण्याचा मनमानी कारभार अधिकारी करत आहेत. त्यामुळे याला वाचा फोडण्यासाठी तीव्र आंदोलन केले जाईल."

- अशोक खोत (विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना)

संपादन - स्नेहल कदम