सातारा जिल्ह्यात 103 कोटींचा महसूल जमा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

सातारा - जिल्ह्यातील वाळूउपशाला गत आर्थिक वर्षात परवानगी मिळाली नसतानाही महसूल वसुलीत जिल्ह्याने १०३ कोटींवर मजल मारली आहे. गौणखनिज विभागाला १०० कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट होते. परंतु, वाळू लिलाव न झाल्याने ते ५० कोटी इतकेच झाले. 

सातारा - जिल्ह्यातील वाळूउपशाला गत आर्थिक वर्षात परवानगी मिळाली नसतानाही महसूल वसुलीत जिल्ह्याने १०३ कोटींवर मजल मारली आहे. गौणखनिज विभागाला १०० कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट होते. परंतु, वाळू लिलाव न झाल्याने ते ५० कोटी इतकेच झाले. 

गत आर्थिक वर्षात जिल्हा प्रशासनाला ११० कोटींचे महसूल प्राप्तीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी महसूल विभागाने १०३ कोटी ८० लाखांचा महसूल वसूल केला. गत वर्षात ६४ वाळू लिलाव काढले गेले. मात्र, हरित लवादाने राज्यभरातील वाळू उपशांवर बंदी घातल्याने हे लिलाव होऊ शकले नाहीत. त्यापूर्वी २०१६-१७ मध्ये वाळू लिलावातून १८ कोटींचा महसूल मिळाला होता. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार दहा कोटी व इतर करांतून सुमारे ४८ कोटींचा महसूल जमा झाला होता. 

अवैध गौणखनिज उत्खननाच्या १०७ प्रकरणांतून ८९ लाख, ७९१ अवैध वाहतुकीवर कारवाईतून चार कोटी ४९ लाखांचा महसूल जमा झाला. या विभागाने ५० गुन्हेही दाखल केले. जिल्हा खनिज प्रतिष्ठानांतर्गत नियामक समितीने मिळालेल्या निधीतून सातारा, जावळी, कऱ्हाड तालुक्‍यास प्रत्येकी २० लाख, कोरेगाव- ३० लाख, पाटण तालुक्‍यास दहा लाख असा एक कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामासाठी दिला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे यांनी दिली. 

सातारा ते पंढरपूर, कऱ्हाड ते चिपळूण या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सातारा-पंढरपूर मार्गातून सुमारे साडेचार कोटी, कऱ्हाड-चिपळूण रस्त्यातून सुमारे साडेतीन कोटी तसेच रेल्वे ट्रॅक दुपरीकरणातून अडीच कोटींचा महसुलास हातभार लागला.

महसूल वसुली (2017-18)
जमीन महसूल - 30.80 कोटी
करमणूक कर - 14.03 कोटी
गौणखनिज उत्खनन - 50.45 कोटी

Web Title: 103 crore revenue collect in satara district