'पंतप्रधान किसान'च्या अपात्र लाभार्थ्यांकडून 1.19 कोटीची वसुली; सर्व रक्कम वसुली करणार 

विष्णू मोहिते
Friday, 18 December 2020

पंतप्रधान किसान सन्मान योजना  लाभार्थी यादीच्या सोशल ऑडिटमध्ये सापडलेले आणि आयकर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापर्यंत 1 कोटी 18 लाख 96 हजार रुपये वसुल झालेले आहे.

सांगली ः पंतप्रधान किसान सन्मान योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. लाभार्थी यादीच्या सोशल ऑडिटमध्ये सापडलेले आणि आयकर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 14 हजार 267 शेतकऱ्यांकडून 11.35 कोटी रक्कम वसुल होणार आहेत. पहिल्या टप्प्यात वसुली आणि दुसऱ्या टप्प्यात कारवाई, असे नियोजन आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापर्यंत 1 कोटी 18 लाख 96 हजार रुपये वसुल झालेले आहे. 

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 4.58 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली. 14 हजार 267 अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला. एक हजार 660 अपात्र लाभार्थी व 12 हजार 607 आयकर भरणाऱ्यांची यादी शासनाकडून पोर्टलवर मिळाल्याचे स्पष्ट झाले. पी. एम. किसान योजनेंतर्गत एक हजार 660 अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 89 लाख 54 हजार तसेच 12 हजार 607 आयकर भरणाऱ्यांच्या खात्यावर 10 कोटी 46 लाख 6 हजार रुपये रक्कम जमा झाली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात 1 डिसेंबर 2018 पासून अंमलबजावणी सुरु असून दोन हेक्‍टरपर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी कुटुंब लाभार्थी आहेत. प्रतिवर्ष सहा हजार रुपये (दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात) दिली जाते. 

यांना लाभ घेता येणार नाही : 

  • आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी-कर्मचारी (चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून) 
  • गेल्या वर्षात प्राप्तिकर भरलेल्या व्यक्ती 
  • मासिक निवृत्ती वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या व्यक्ती 
  • नोंदणीकृत डॉक्‍टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ 
  • जमीन धारण करणारी संस्था 
  • संकेतस्थळ https://pmkisan.gov.in 

अशी परत घेणार रक्‍कम : 

  • प्रत्येक तहसील कार्यालयाकडून स्वतंत्र बॅंक खाते उघडणार 
  • जिल्हा प्रशासनाकडूनही स्वतंत्र खाते 
  • बॅंक खात्यात रक्‍कम परत करण्याची लाभार्थ्यांना नोटीस 
  • केंद्र सरकारला रक्कम परत करणार 

संबंधितांना नोटिसा बजावल्या

पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांमध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्‍तींनी लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून वसूल होईल. संबंधितांना नोटिसा बजावल्यात. बॅंक खात्यात तातडीने रक्‍कम जमा करण्याच्या सूचना संबंधित अपात्र लाभार्थ्यांना दिल्या आहेत.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1.19 crore recovered from ineligible beneficiaries of 'Prime Minister Kisan'; Will recover all amount