सातारा विवाह नोंदणी कार्यालयात ११९ शुभमंगल!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

जिल्ह्यातील नवयुवक व युवतींचा वाढला कल; दुष्काळ, नोटाबंदीचा परिणाम
सातारा - सततची दुष्काळी परिस्थिती, वाढती महागाई व नोटाबंदीमुळे लग्न समारंभात येणाऱ्या पैशाच्या अडचणींवर उपाय म्हणून जिल्ह्यातील नवयुवक व युवतींचा नोंदणी विवाह करण्याकडे कल वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून यावर्षी जिल्ह्यातील सहायक दुय्यम निबंधक अधिकारी, विवाह नोंदणी कार्यालयात लग्नसराईत आजपर्यंत तब्बल ११९ नोंदणी विवाह संपन्न झाले.

विवाह कार्यात अनावश्‍यक खर्चाचे प्रमाण जास्त असते. ‘लग्न एकदाच होते’ असे समजून अनेकजण तुफान खर्च करतात. मात्र, पुन्हा हा खर्च डोईजड होतो. काही वेळा एका बाजूकडील लोकांची खर्च करण्याची मानसिकता नसते. मात्र, दुसऱ्या बाजूची खर्च करण्याची इच्छा असल्याने एकाची फरफट होत असते. आता त्याला हळूहळू फाटा दिला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात दरवर्षी नोंदणी विवाह करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे नोंदणी कार्यालयातून सांगण्यात आले. 

विवाह नोंदणी कार्यालयात होणाऱ्या लग्नांची संख्या वाढत असल्याने कार्यालयास अनेकदा मंगल कार्यालयाचे स्वरूप प्राप्त होत आहे.

कार्यालयातच वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहार घालून मोजक्‍या नातेवाईकांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने हे विवाह संपन्न होत असतात. नोंदणी विवाहाची पद्धत अतिशय सोपी असून, नावनोंदणीसाठी वधू-वरांनी एक महिना आधी संपर्क करावा लागतो. वधू- वरांचे ओळखपत्र व जन्मतारखेचा पुरावा आवश्‍यक असतो. प्रत्यक्ष विवाहावेळी दोन साक्षीदार आवश्‍यक असतात. नोंदणी विवाहमुळे वधू पक्ष व वर पक्षाकडील पैशाची बचत होऊन इतर नातेवाईकांच्या वेळ व पैशाची बचत होते. वधू-वर दोघेही जिल्ह्यातील असल्यास नोटीस शुल्क ५० रुपये, तर विवाह नोंदणी शुल्क १५० रुपये आणि जोडप्यातील एकजण परजिल्ह्यातील असल्यास नोटीस शुल्क १०० आणि विवाह नोंदणी शुल्क १५० रुपये असून, एक महिन्याचा नोटीस कालावधी आणि त्यानंतर ६० दिवस लग्नासाठी कालावधी असल्याचे कार्यालयातून सांगितले.

ग्रामीण भाग आघाडीवर
सुशिक्षित, मध्यमवर्गीय लोकांचा नोंदणी विवाह पद्धतीकडे कल असायचा, तर ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने विवाह लागत होते. आता हे चित्र बदलत आहे. सध्या नोंदणी विवाहात ग्रामीण भागातील प्रमाण शहरी भागापेक्षाही जास्त आहे.

Web Title: 119 marriage in marriage registration office