सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी 13.18 कोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

निवडणुकीच्या तोंडावर हा निधी राज्य शासनाने उपलब्ध केल्याने पर्यटनस्थळांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

सातारा  : पर्यटन विकासासाठी जिल्ह्यातील चार पर्यटनस्थळांवरील विविध कामांसाठी 13.18 कोटींचा निधी राज्य शासनाने उपलब्ध केला आहे. यामध्ये वेण्णालेकचे लॅण्डस्केपिंग, पाचगणीतील टेबललॅण्डचा विकास, तापोळा आणि रेठरे येथे कृष्णा नदीचा घाट बांधण्याच्या कामांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पर्यटन विकासाची कामे मार्गी लागली आहेत. 

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी नियोजन समितीतून निधी उपलब्ध केला जातो; पण या वेळेस थेट राज्य शासनाने पर्यटन विभागाकडून नियोजन समितीकडे निधी उपलब्ध केला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून हे पैसे उपलब्ध झाले आहेत. यातून महाबळेश्‍वर, पाचगणी, तापोळा या पर्यटन स्थळांच्या विकासासोबत रेठरे येथे कृष्णामाई घाटाचे बांधकाम आणि सुशोभीकरण होणार आहे. यासाठी 13 कोटी 18 लाख 56 हजार रुपयांचा निधी नियोजन समितीकडे उपलब्ध झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा निधी राज्य शासनाने उपलब्ध केल्याने पर्यटनस्थळांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

या उपलब्ध निधीतून कोयनानगर येथील बगिचामध्ये लहान मुलांसाठी वॉटरपार्क बांधण्यासाठी एक कोटी, ओझर्डे धबधबा विकासासाठी दीड कोटी, अंबाकळपी देवी मंदिर बोपोलीच्या विकासासाठी 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे. महाबळेश्‍वरला पाच कोटी रुपये दिले असून, यातून वेण्णालेक परिसराचा विकास आणि लॅण्डस्केपिंग करण्याच्या कामाचा समावेश आहे. पाचगणीसाठी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे. यातून टेबललॅण्ड परिसर विकास करणे, शौचालय सुविधा उपलब्ध करणे या कामांचा समावेश आहे. तापोळा येथे विकासकामांसाठी दोन कोटी रुपये दिले जाणार आहेत. यातून तापोळा अंतर्गत रस्ते, शिवसागर जलाशयास संरक्षक भिंत बांधणे व शौचालयांचे बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे. 

रेठऱ्यात कृष्णामाई घाटाचे सुशोभीकरण 

रेठरे (ता. कऱ्हाड) येथील विकासकामांसाठी दोन कोटी आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. यामध्ये कृष्णा नदीला घाट बांधणे व कृष्णामाई घाटाचे सुशोभीकरण करणे या कामांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13.18 crore for tourism development in Satara district